इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे अफवांना उधाण, छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन दरवाढीच्या आणि टंचाईच्या अफवा पसरत असून त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात उमटले.

Published : March 4, 2026 at 9:56 AM IST
छत्रपती संभाजीनगर : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाची आवक बंद होणार आणि त्यामुळे इंधनटंचाई निर्माण होणार, अशी अफवा मंगळवारी (3 मार्च) सायंकाळी संपूर्ण शहरात पसरली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इंधनपुरवठा खंडित झाल्यास अडचण निर्माण होईल, या भीतीनं अनेकांनी वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्या.
दरम्यान, या परिस्थितीबाबत पेट्रोल डीलर्स असोसिएशननं स्पष्टीकरण देत कोणतीही इंधनटंचाई नसल्याचं स्पष्ट केलं. इंधनसाठा मुबलक असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं. होळीच्या पार्श्वभूमीवर दुपारपर्यंत पेट्रोल पंप बंद होते. त्यानंतर नियमितपणे पेट्रोल-डिझेल विक्री सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी दिली.
मंगळवारी अचानक वाढली गर्दी : इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधनदर वाढीच्या आणि टंचाईच्या अफवा पसरत असून त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात उमटले. 'युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणारट,' अशा अफवा वेगावनं पसरल्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांनी वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्या. रस्त्यावर वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पेट्रोल संपेल किंवा दर वाढतील या भीतीपोटी गर्दी केल्याचे काही ग्राहकांनी सांगितलं.
'अफवांवर विश्वास ठेऊ नका' : ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केलं. रविवारी सुट्टीमुळे इंधनाची आवक कमी असते. त्यानंतर धुलीवंदनमुळे काही ठिकाणी पुरवठा वेळेवर न झाल्यानं काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवावे लागले होते. मात्र नंतर इंधन उपलब्ध झाले. तोपर्यंत अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या.
सध्या युद्धाचा पेट्रोल उपलब्धतेवर कोणताही थेट परिणाम झालेला नाही. शहरात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन 'छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशन'च्या वतीने करण्यात आलं आहे.
हेही वाचा
- पश्चिम आशियात अडकलेल्या राज्यातील 164 जणांचं यशस्वी 'एअरलिफ्ट'; भारतात परतलेल्या लोकांनी सांगितले थरारक अनुभव
- दुबईत अडकलेल्या कोल्हापूरकरांचा जीव मुठीत घेऊन परतीचा प्रवास; यूएईनं दिलं 26 हजारांचं 'सॉरी गिफ्ट'
- इन्शुरन्स कंपनीच्या सेमिनारसाठी गेलेले साताऱ्यातील 34 जण अडकले दुबईत, मायदेशी परतण्यासाठी आतूर

