महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली; जमीन खचल्यानं काँक्रीट रस्त्याला तडे
महाबळेश्वर परिसरात लहान-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नावली गावाकडं जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठी दरड कोसळली आहे.

Published : July 4, 2026 at 10:57 PM IST
सातारा : मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यात लहान-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावरील नावली गावाकडं जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठी दरड कोसळली. मातीचा प्रचंड मलबा, दगड आणि झाडं रस्त्यावर आल्यानं काही काळ गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

घाट परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू : सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नावली गावाकडं जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठी दरड कोसळून मातीचा प्रचंड मलबा, दगड आणि झाडं रस्त्यावर आल्यानं काही काळ गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. दरड कोसळल्याची माहिती मिळताच सातारा जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्यानं रस्त्यावरील मातीचा मलबा, दगड आणि उन्मळून पडलेली झाडं हटवण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आलं.

नावली गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्याला मोठे तडे : दरड कोसळल्यामुळे नावली गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीनं पाहणी करण्यात आली असून दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. यासंदर्भात तहसीलदार सचिन मस्के यांनी सांगितलं की, "दरड कोसळलेल्या परिसरात पाण्याची टाकी आहे. मात्र ती सध्या रिकामी असल्यानं कोणताही अतिरिक्त धोका निर्माण झालेला नाही. अधिक तपासणीनंतर संबंधित टाकी धोकादायक असल्याचं आढळल्यास ती हटविण्याबाबत निर्णय घेतला जाईल."

कुटुंबांचं स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू : दरम्यान, दरड कोसळलेल्या ठिकाणच्या घरात सध्या कोणीही राहत नाही. तसेच नजीकच्या तीन घरांना सध्या कोणताही धोका नसल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आलं असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरातील कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसामुळे दरडी कोसळत असल्यानं डोंगरकड्यालगतच्या भागात जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा :

