ETV Bharat / state

गुलशन कुमार हत्या प्रकरण: मारेकरी अब्दुल रऊफ मर्चंटचा हृदयविकारानं मृत्यू

टी सीरीजचे मालक गुलशन कुमार यांचा मारेकरी अब्दुल रऊफ मर्चंट याचा छत्रपती संभाजीनगरात मृत्यू झाला. अब्दुल रऊफ मर्चंट हर्सूलच्या कारागृहात शिक्षा भोगत होता.

ABDUL RAUF MERCHANT DIED IN JAIL
अब्दुल रऊफ मर्चंट (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 11:46 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर : टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी अब्दुल रऊफ मर्चंट (वय 60) याचा गुरुवारी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीनं देण्यात आली आहे. रऊफ मर्चंटची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. 30 डिसेंबर रोजी त्याला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यानं घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानं 4 जानेवारीला त्याला पुन्हा कारागृहात आणलं गेलं. मात्र, गुरुवारी सकाळी पुन्हा त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं तातडीनं घाटी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती हर्सूल कारागृह अधीक्षक खामकर यांनी दिली आहे.

गुलशन कुमार यांच्या हत्येत भोगत होता शिक्षा : मुंबई इथं 12 ऑगस्ट 1997 रोजी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आणि टी सिरीज या म्युझिक कंपनीचे मालक गुलशन कुमार यांची एका मंदिराबाहेर क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी आरोपी अब्दुल रऊफ मर्चंट हा अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक होता. त्यानं गुलशन कुमार यांच्यावर तब्बल 16 राऊंड फायरिंग केले होते. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला. पोलिसांनी कारवाई करत गुन्ह्यात अटक केलेल्या मर्चंटला 2002 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 2003 मध्ये त्याची रवानगी येरवडा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली होती.

हर्सूल कारागृहात पडला होता आजारी : शहरातील हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेला अब्दुल मर्चंट याला 30 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकृती सुधारल्यानं 4 जानेवारीला पुन्हा हर्सूल कारागृहात नेण्यात आलं. मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्यानं त्याला घाटी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी उपचारादरम्यान 8 जानेवारी रोजी त्याचं निधन झालं. अब्दुल मर्चंट याला 2009 मध्ये पॅरोलवर (रजा) सोडण्यात आलं होतं. हर्सूल जेलमधून बाहेर पडल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. तब्बल आठ वर्षे तो गायब होता. मात्र 2016-17 च्या सुमारास पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी पुन्हा हर्सूल कारागृहात करण्यात आली होती. तेव्हापासून तो आपली उर्वरित शिक्षा भोगत होता.

हेही वाचा :

  1. Gulshan Kumar Murder अब्दुल रौफची जन्मठेप कायम, राशिदची मात्र मुक्तता
  2. हर्सूल कारागृहातील कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू
  3. कैद्यांनी तयार केले बनावट जामीनपत्र, तीन जणांवर गुन्हा दाखल