अहमदाबादच्या साईभक्तांकडून 12.39 लाखांची 'सोन्याची श्रीगणेश मूर्ती' शिर्डी साईबाबांना अर्पण
भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी देतात.

Published : December 15, 2025 at 4:33 PM IST
|Updated : December 15, 2025 at 4:42 PM IST
शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचे महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांवर (Shirdi Sai Baba) देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या भावनेतून भाविकांकडून साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचं दान अर्पण केलं जातं. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्त परिवाराने शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल 12 लाख 39 हजार 440 रुपये किंमतीची सोन्याची श्रीगणेश मूर्ती देणगी स्वरूपात अर्पण केली आहे.
सोन्याची श्रीगणेश मूर्ती शिर्डी साईबाबा संस्थानकडे सुपूर्द : अहमदाबाद येथील या साईभक्त परिवाराने 102.450 ग्रॅम वजनाची सोन्याची श्रीगणेश मूर्ती आज शिर्डी साईबाबा संस्थानकडं सुपूर्द केली. या मूर्तीची बाजार भावानुसार किंमत 12 लाख 39 हजार 440 रुपये इतकी आहे. मात्र, या उदार देणगीचे दाते असलेल्या साईभक्त परिवाराने आपले नाव गुप्त ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे साईभक्त कुटुंबीय अनेक वर्षांपासून नियमितपणे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असून, काही महिन्यापूर्वी त्यांनी साईबाबांना सुवर्णहार देखील अर्पण केला होता. आज देणगी स्वरूपात दिलेली श्रीगणेश मूर्ती साईबाबांच्या समाधीसमोर काही काळ ठेवून साईभक्तांनी मनोभावे दर्शन घेतलं. यानंतर ही सोन्याची श्रीगणेश मूर्ती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांच्याकड विधीपूर्वक सुपूर्द करण्यात आली.
पूजेदरम्यान वापरण्यात येणार 'श्रीगणेश मूर्ती' : यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीनं देणगीदार साईभक्तांचा शाल आणि साईबाबांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. साईभक्त परिवाराने अर्पण केलेली ही सोन्याची श्रीगणेश मूर्ती साईबाबा मंदिरात उत्सव आणि सणाच्या काळात होणाऱ्या पूजेदरम्यान वापरण्यात येणार असल्याची माहिती, उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांनी दिली. तसेच याआधी देणगी स्वरूपात या भाविकाने दिलेला सोन्याचा हार देखील सध्या संस्थानच्या वतीनं वापरण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
- आसाम आणि छत्तीसगड राज्यातील साईभक्ताचं सुवर्ण दान; सुवर्ण पदक आणि सोन्याचे गुलाब फूल साईंच्या चरणी अर्पण
- चेन्नईच्या साईभक्ताकडून शिर्डी साईबाबांना एकूण 48 लाखांची देणगी; 25 लाखांची सोन्याची छत्री आणि 23 लाख रोख अर्पण
- साईबाबांच्या चरणी 74 लाखांचे सोन्याचे ताट अर्पण; मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांची अनोखी सुवर्ण भेट

