ETV Bharat / state

घरात घुसून तरुणीचं अपहरण : बंदुकीचा धाक दाखवत नराधमाची कुटुंबीयांना मारहाण; रोख रक्कम, दागिने लंपास

23 वर्षीय तरुणीचं घरात घुसून अपहरण केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तरुणीच्या वडिलांनी नराधमाला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यानं पिस्तूल काढून मारहाण केली.

Abducted 23 Years Girl From Daund
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 4, 2026 at 3:44 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : दौंड तालुक्यातील बोरीभडक इथं एका 23 वर्षीय तरुणीचं घरात घुसून अपहरण केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी तरुणीच्या आई-वडिलांनी या नराधमाला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यानं पिस्तूल काढून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. यानंतरही मुलीच्या वडिलांनी पीडितेला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपहरणकर्त्या नराधमानं त्यांना धक्का देत मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी 5 लाख 1 हजार रुपये आणि 7 तोळे दागिने या नराधमानं चोरून नेल्याचा आरोपही अपहरण झालेल्या तरुणीच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत केला आहे. "या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये कमरुद्दीन मुकीम शेख आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली आहे.

Abducted 23 Years Girl From Daund
यवत पोलीस ठाणे (ETV Bharat)

घरात घुसून तरुणीचं अपहरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीभडक येथील तरुणीला हडपसर येथील कमरुद्दीन मुकीम शेख हा काही दिवसांपासून त्रास देत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला घराबाहेर जाण्यास मनाई केली होती. 2 जुलै 2026 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी कमरुद्दीन शेख हा दोन साथीदारांसह पीडितेच्या घरात घुसला. त्यानं तरुणीला जबरदस्तीनं ओढून नेत असताना कुटुंबीयांनी त्याला विरोध केला. त्यावेळी आरोपीनं पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पीडितेचे वडील, आजोबा व आई यांना मारहाण केली. आरोपीनं तिच्या आईशी गैरवर्तन करून शिवीगाळही केली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

रोख रक्कम अपहरणकर्त्यांनी पळवली : आरोपींनी घरातील नर्सरी व्यवसायासाठी ठेवलेली 5 लाख एक हजार 500 रुपये रोख रक्कम तसेच सात तोळ्याचे सोन्याचे दागिने जबरदस्तीनं लंपास केले. त्यानंतर पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात बसवून आरोपींनी तिचं अपहरण करून घटनास्थळावरून पलायन केलं. या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कमरुद्दीन मुकीम शेख व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74 , 79 , 309( 2) , 333 , 115 (2) , 338 , 351 (2), 3 (5) शास्त्र अधिनियम 3 , 25 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

  1. भिगवणमध्ये भर बाजारपेठेत थरार! आई व भावाच्या डोळ्यांत चटणी टाकून तरुणीचं अपहरण? महिला तर म्हणते मी मर्जीनं गेले
  2. साई संस्थान भक्तनिवासात पश्चिम बंगालच्या तरुणीचा विनयभंग : आरोपी अमन पठाणविरुद्ध गुन्हा दाखल
  3. अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : महाविद्यालयीन तरुणीवर नराधमांचा बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या