शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.


Published : June 30, 2026 at 7:14 PM IST
|Updated : June 30, 2026 at 7:55 PM IST
पुणे - राज्यात सर्वत्र 23 जून रोजी मान्सून दाखल झाला असून राज्यात जून महिन्यात जवळपास 47 टक्के पावसाची तूट निर्माण झालीय. अजूनही राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी दिली आहे.
हवामान विभागाचे प्रमुख डॉ एस. डी. सानप म्हणाले की राज्यात 23 जून रोजी सर्वत्र मान्सून दाखल झाला होता. मात्र यानंतर देखील मान्सूनचे वारे हे कमकुवत झाले होते आणि राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण हा कमी होताना पाहायला मिळालं. पण आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील काही भागात यलो अलर्ट तर घाट माथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. जून महिन्यात सरासरीच्या पेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला असून जून महिन्यात जवळपास 47 टक्के कमी पाऊस झाला असल्याचं यावेळी ते म्हणाले.
सानप पुढे म्हणाले की, उद्यापासून ते पुढील संपूर्ण आठवडाभर कोकण, गोवा विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात देखील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील आठवडाभर बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं यावेळी सानप यांनी सांगितलं.
हेही वाचा...

