ETV Bharat / state

‘सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे देशद्रोह नाही’; मुंबईत 'जेन झी'च्या आवाजाला शबाना आजमी, रघुराम यांची साथ

‘दिल से बोल मुंबई विथ जेन झी’ कार्यक्रमात अभिनेत्री शबाना आझमी यांनी मुंबई पुन्हा एकदा एकत्र आल्याचं सांगत तरुण पिढीचं कौतुक केलं.

Gen Z Voices in Mumbai
मुंबईत 'जेन झी'च्या आवाजाला शबाना आजमी, रघुराम यांची साथ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 24, 2026 at 8:46 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या वतीनं मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ‘दिल से बोल मुंबई विथ जेन झी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह नेहा बोरा, अनिश गावंडे, रघुराम, वरुण ग्रोव्हर आणि दिवाकर बॅनर्जी उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तरुणांनी उपस्थिती लावली होती.

मुंबईत 'जेन झी'च्या आवाजाला शबाना आजमी, रघुराम यांची साथ (ETV Bharat)

'मुलींनी शिवी देणं चुकीचं होतं, तर मग...' : यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवक अध्यक्ष अनिश गावंडे यांनी मुंबईच्या आंदोलनाच्या इतिहासाचा उल्लेख करताना तरुणांच्या आंदोलनावरून झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. गावंडे म्हणाले, “मुंबई नेहमी जागृत शहर राहिलं आहे. मुंबईकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन योगदान दिलं आहे. याच मुंबईत जयप्रकाश नारायण आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे नेते निर्माण झाले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुंबईतील तरुण पिढीनं यंदाचं आंदोलन करून दाखवलं.”

यावेळी तरुणींकडून शिवीगाळ झाल्याच्या आरोपावरही गावंडे यांनी भाष्य केलं. “जर या मुलींनी शिवी देणं चुकीचं होतं, तर या मुलांना लाठीनं मारणंही चुकीचं होतं. या मुलांवर गोळीबार करणंही चुकीचं होतं,” असं ते म्हणाले. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी काही जण तरुणांवर आरोप करत असल्याचा आरोपही अनिश गावंडे यांनी यावेळी केला.

या कार्यक्रमाला आले याचा मला अभिमान - शबाना आझमी : ‘दिल से बोल मुंबई विथ जेन झी’ कार्यक्रमात अभिनेत्री शबाना आझमी यांनी मुंबई पुन्हा एकदा एकत्र आल्याचं सांगत तरुण पिढीचं कौतुक केलं. “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुंबई शांत होती, असं म्हटलं गेलं. मात्र आज मुंबई पुन्हा एकदा एकत्र आली आहे. मी या कार्यक्रमाला आले याचा मला अभिमान आहे. मुंबईच्या तरुण पिढीला भेटून आनंद झाला,” असंही शबाना आझमी म्हणाल्या.

आज मी मुंबईतील निडर मुलांना भेटलो- रघुराम : दरम्यान, 'ईटीव्ही भारत'शी बोलताना रघुराम यांनीही तरुणांच्या भूमिकेचं समर्थन केलं. “आज मी मुंबईतील निडर मुलांना भेटलो, याचा मला अभिमान आहे. सरकारविरोधात आवाज उठवणं महत्त्वाचं असतं. आज मी या सरकारविरोधात आवाज उठवला, याचा मला अभिमान आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं आहे. मुंबईतील तरुणांनीही सरकारविरोधात आवाज उठवला असून, त्या सर्व मुलांना भेटून मला आनंद झाला,” असं रघुराम म्हणाले.

'राहुल गांधींच्या भेटीतून आयुष्यभराचा आत्मविश्वास मिळाला' : नुकतीच पुण्यात राहुल गांधी यांची भेट घेतलेल्या ज्ञानेश्वरी ऐवडी यांनीही तरुणांच्या भूमिकेवर भाष्य केलं. “आज आम्ही तरुण विचारमंथन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. या सर्व मुलांनी सरकारविरोधात आवाज उठवला आहे. त्यांना देशद्रोही म्हटले जात आहे, जे चुकीचं आहे. सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नसतो,” असं त्या म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्या भेटीतून आपल्याला आयुष्यभराचा आत्मविश्वास मिळाला, अशी भावनादेखील ज्ञानेश्वरी ऐवडी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

  1. आंदोलक ते मतदार : 'जेन झी'च्या ताकदीची सर्वांनाच झाली जाणीव; राजकीय समीकरणं कशी अन् किती बदलली?
  2. भाजपाची 'जेन झी' नवीन समिती : नितीन नबीन यांनी घेतली पहिली बैठक
  3. भाजपानं मोहन भागवत यांचं ऐकावं, भाजपा-'आरएसएस'मधील विरोधाभास उघड, अभिजीत दिपकेंनी सुनावलं