ETV Bharat / state

'मी चुकलो, माझ्यावर लागलेला कलंक मिटवण्यासाठी...'; गुंड बापू उर्फ कुमार नायर Exclusive ऑन 'ईटीव्ही भारत'

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहरातील गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात आल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.

bapu nair
गुंड बापू नायर यांच्यासोबत प्रतिनिधींनी साधलेला संवाद (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 2, 2026 at 5:30 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुराळा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख संपली असून, आता चित्र स्पष्ट झालं आहे. पुण्यात राष्ट्रवादीनं गुंडांना उमेदवारी देत सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय निर्माण केला. यावरुन राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली जात आहे. आंदेकर कुटुंब, नायर, मारणे यांना उमेदवारी दिल्यानं पुणेकर किती सुरक्षित आहेत हाच प्रश्न यानिमित्तानं विचारला जात आहे.

नायर यांना उमेदवारी कोणी दिली? - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहरातील गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात आल्याने जोरदार चर्चा सुरू झाली. भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक ३९ चे उमेदवार गुंड बापू उर्फ कुमार नायर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी त्यांच्यासोबत Exclusive संवाद साधला. अजित पवारांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण, मला रिपाइं खरात गटाकडून उमेदवारी देण्यात आली. माझ्यावर जे कलंक लागले आहेत, ते मिटवण्याचा माझा प्रयत्न असून, मी यासाठी निवडणूक लढवत असल्याचं बापू उर्फ कुमार नायर यांनी सांगितलं.

गुंड बापू नायर यांच्यासोबत प्रतिनिधींनी साधलेला संवाद (ETV Bharat Reporter)

...म्हणून राजकारणात आलो - समाजासाठी काही करता येतं का हे पाहण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. माझा बऱयाच काळाचा इतिहास असून, समाजासाठी काही चांगलं करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष असलेल्या रिपाइं खरात गटाकडून संधी मिळाली आहे. आमच्या प्रभागात अनेक समस्या असून, ड्रेनेजची मोठी समस्या आहे. या समस्या मला सोडवायच्या आहेत. माझ्या प्रभागातील लहान मुलं गुन्हेगारीकडं वळली आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनेक महिलांचे प्रश्न असून, ते सोडवण्याचं माझं उद्दिष्ट असल्याचं यावेळी बापू नायर यांनी सांगितलं.

माझ्याकडून चूक झाली - "पुणे महानगरपालिकेसाठी उभे असलेल्या उमेदवारांपैकी जवळपास 60 टक्के उमेदवार हे गुन्हेगार आहेत. म्हणजे ज्यांच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळं गुन्हे दाखल आहेत. राजकारणात गुन्हेगारी आहे. इतर गुंड नसतात, मग आम्हाला दिलेली गुंडाची पदवी काढा," असं म्हणत बापू नायर यांनी गुन्हेगाराची व्याख्या सांगितली. तसंच माझ्याकडून चूक झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.

प्रभागातील समस्या सोडवणार - कधीतरी नवीन प्रवाहात यायचं होतं. ती संधी आता मिळाली आहे. त्यामुळं याचं सोनं करणार आहे. मी गेल्या 40 वर्षापासून या प्रभागात राहतो. त्यामुळं येथील समस्या मला माहिती आहेत. या समस्या सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन नायर यांनी दिलं.

हेही वाचा -

  1. शाहरुख खानची भूमिका देशविरोधी, बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमानला केकेआरमध्ये घेतल्यानं स्वामी रामभद्राचार्य संतापले
  2. मुंबई महापालिका निवडणूक : आमच्यासाठी जो चांगलं करेल तो नगरसेवक पाहिजे, कुलाबा येथील कोळीबांधवांनी व्यक्त केल्या अपेक्षा
  3. उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून चक्क उमेदवारालाच डांबून ठेवलं! भाजपा आमदारांच्या मध्यस्थीला यश