गडचिरोलीचं भयाण वास्तव! प्रसववेदना सहन करत गरोदर तरुणी पतीसह 6 किमी चालली; आधी बाळ गेलं, नंतर आईचाही अंत
गडचिरोली जिल्ह्यातून एक संताप आणणारी बातमी समोर आली आहे. गावात प्रसूतीसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यानं एका गरोदर महिलेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला.

Published : January 3, 2026 at 11:46 AM IST
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावात प्रसूतीसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यानं एका गरोदर महिलेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गाव मुख्य रस्त्यापासून दूर असून तिथं जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नाही. तसेच, गावात प्रसूतीसाठी कोणतीही वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध नव्हती. या कारणामुळे गरोदर महिलेला उपचारासाठी सुमारे 6 किलोमीटर अंतर पायी चालत जावं लागलं. ती आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, चालताना तिला तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. उपचार वेळेवर न मिळाल्याने तिची प्रकृती खालावली आणि तिचा तसेच गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य व दळणवळण सुविधांअभावी निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
उपचाराच्या आशेनं जंगलातून 6 किमी पायपीट : मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील अलदंडी टोला येथील रहिवासी 24 वर्षीय आशा संतोष किरंगा ही 9 महिन्यांची गरोदर होती. तिचं मूळ गाव अलदंडी टोला हे मुख्य रस्त्यांपासून दूर असून, गावात प्रसूतीसाठी कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही.
वेळेवर उपचार मिळावेत या अपेक्षेनं आशानं 1 जानेवारी रोजी पतीसोबत जंगलातील मार्गानं सुमारे 6 किलोमीटर अंतर पायी चालत पेठा येथील बहिणीच्या घरी जाण्याचं ठरवलं. मात्र, गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यातील हा कठीण प्रवास तिच्यासाठी अक्षरशः जीवघेणा ठरला.
2 जानेवारी रोजी सकाळी तिला तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्यानंतर तिला रुग्णवाहिकेद्वारे हेडरी येथील काली अम्मल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सिझेरियन प्रसूतीचा निर्णय घेतला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बाळाचा गर्भाशयातच मृत्यू झाला होता. त्यानंतर काही वेळातच उच्च रक्तदाबामुळे आशा किरंगा हिचाही मृत्यू झाला.
मृत्यूनंतरही पार्थिवाची हेळसांड : या घटनेतील आणखी वाईट वास्तव म्हणजे, मृत्यूनंतरही पार्थिवाची हेळसांड थांबली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, मात्र, तिथं स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचं कारण पुढे करत त्यांना पुन्हा 40 किलोमीटर लांब अहेरीला पाठवण्यात आलं. जिवंतपणी नशिबी आलेली पायपीट मृत्यूच्या पश्चातही उदासीन व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? : या घटनेबाबत, गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितलं की, "आशा कार्यकर्त्यांमार्फत महिलेची नोंदणी करण्यात आली होती. तिला अचानक प्रसूती वेदना जाणवल्या. महिला अनेक किमी चालल्यामुळे तिला प्रचंड त्रास झाला. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही. याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल."
मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीकडे लक्ष द्यावं- सतेज पाटील : "सध्या महाराष्ट्रात सरकारचे सर्वच क्षेत्रात वाभाडे निघत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याची परिस्थिती गंभीर आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीकडे थोडं लक्ष द्यायला हवं. गडचिरोलीत भेट द्यायला हवी," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया : दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्च करेन आणि माहिती घेईन." अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. गडचिरोलीला राज्यातील 'नंबर वन' जिल्हा बनवण्याचे दावे अनेकदा केले गेले. गडचिरोलीला नक्षलमुक्त करण्याच्या, तिथे विकासाची गंगा आणण्याच्या चर्चाही होत असतात. मात्र, या घटनेने सध्याचं वास्तव प्रातिनिधिक स्वरुपात अधोरेखित केलं आहे.
हेही वाचा

