स्वराज्याच्या लढायांपासून शेतरक्षणापर्यंत गोफणीचा अद्भुत वापर, काळानुरुप शस्त्रात कसा झाला बदल?
गोफणचा वापर शिकारीपासून युद्धात करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांकडूनदेखील गोफणचा वापर करण्यात आला. जाणून घ्या, सविस्तर इतिहास

Published : February 24, 2026 at 4:01 PM IST
|Updated : February 24, 2026 at 5:27 PM IST
अमरावती - उंच मचाणावर उभा राहून शेतात शिरलेल्या पक्षी, प्राण्यांना हाकलताना गोफण फिरवणारा शेतकरी आजही ग्रामीण भागात दिसतो. साधी वाटणारी ही गोफण प्रत्यक्षात केवळ दगड फेकण्याचं साधन नाही, तर मानवाच्या प्राचीन बुद्धिमत्तेचा आणि युद्ध कौशल्याचा साक्षीदार असलेलं एक प्रभावी अस्त्र आहे. शेतीचं रक्षण, शिकार आणि अगदी राज्यसंरक्षणातही गोफणीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या गोफण संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
दगडाला गती देणारं पहिलं अस्त्र- मानवानं शिकार केल्यानंतर त्याच्या हातातलं पहिलं शस्त्र म्हणजे दगड आहे. पण, या दगडाला अधिक वेग आणि अचूकता देण्यासाठी त्यानं गोफणीचा शोध लावला. सुरुवातीला वेलींना दगड बांधून गोल फिरवत फेकलं जायचं. त्यानंतर चामड्याच्या पट्ट्या, मजबूत दोर आणि विशिष्ट गाठी वापरून अधिक सक्षम गोफण तयार झाल्याची माहिती शिवकालीन शस्त्रसाठ्याचे संग्राहक शिवा काळे यांनी दिली.
शिवकालीन रणांगणात गोफणीची ताकद-शत्रुंविरुद्ध मराठा सैन्यानं गोफणीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं महाराष्ट्र जिंकण्यासाठी मोहिमा उघडल्या. तेव्हा छोटासा वाटणारा रामशेज किल्ला जिंकण्यासाठी मोगल सैन्याला तब्बल साडेपाच वर्ष झुंज द्यावी लागली. या किल्ल्यावर मुठभर मावळे हातात गोफण घेऊन होते. अचूक नेम साधणारा मावळा शत्रूच्या टाळूवर थेट प्रहार करायचा. ही गोफण केवळ साधी दोरी नव्हती तर अचूकतेचा आणि सरावाचा कस लागणारं युद्धास्त्र होतं. याबाबतचा उल्लेख शिवभारत या ग्रंथात येतो. शिवभारतमध्ये गोफणचा उल्लेख शेफणी असादेखील केलेला आढळतो. संस्कृत ग्रंथांमध्ये गोफणचा उल्लेख 'चक्राश्म' असा केला असल्याची माहितीदेखील शिवा काळे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या हातातील रक्षणकवच - "शिकारी आणि युद्धाच्या प्रवासानंतर गोफणचा प्रवास हा खऱ्या अर्थानं शेतात सुरू झाला. शेतीच्या रक्षणाकरिता शेतकऱ्यांचं विश्वासू साधन म्हणून गोफणची ओळख निर्माण झाली. शेतात माकडं, डुक्करं, रान डुक्कर किंवा पक्षांचा उपद्रव झाला की मचाणावर बसलेला शेतकरी गोफण फिरवून त्यांच्या दिशेनं वेगात दगड भिरकावून पळवून लावतो. ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गोफण सहजपणे सापडायची. आजदेखील अनेक शेतकऱ्यांकडे ती उपलब्ध आहे. खरंतर शेतकऱ्यांसाठी गोफण हे आवश्यक साधन समजलं जायचं", असंदेखील शिवा काळे म्हणाले.

आता परंपरा अडकली संग्रहालय- "आज आधुनिक साधनांनी गोफणीची जागा घेतली आहे. त्यामुळं नव्या पिढीसाठी गोफण ही केवळ संग्रहालयातील वस्तू ठरते आहे. आज लोकांना ही साधी दोरी वाटते. पण, इतिहासात हे अत्यंत घातक अस्त्र म्हणून वापरलं जात होतं. मराठा सैनिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर या गोफणचा वापर करत असात. आम्ही जेव्हा आमच्या शस्त्र प्रदर्शनाद्वारे गोफणीचं ऐतिहासिक महत्त्व हे नव्या पिढीला सांगतो, त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटतं", अशी शिवा काळे यांनी माहिती दिली.


- मानवाच्या इतिहासातील दगडाला वेग देणारं पहिले अस्त्र.
- संस्कृत भाषेत 'चक्राश्म', इतिहास ग्रंथात ' शेफणी 'असा उल्लेख.
- मराठा सैनिकांकडून प्रभावी युद्धास्त्र म्हणून वापर.
- रामशेज किल्ला लढाईत मावळ्यांचे प्रभावी अस्त्र.
- शेतकऱ्यांसाठी पिकांचं संरक्षण करणारं पारंपारिक साधन.
- वारसा जपण्याची गरज - "गोफण ही केवळ भूतकाळातील वस्तू नाही, तर मानवाच्या बुद्धिमत्ता, कौशल्य आणि संघर्षाची ती साक्ष आहे. शेतकरी संस्कृतीपासून शिवकालीन रणांगणापर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. आज, या परंपरेचा इतिहास जपणं आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं, हीच खरी गरज आहे. साध्या दिसणाऱ्या या गोफणीत आपल्या इतिहासाचा एक अभिमानास्पद अध्याय दडलेला आहे", असं शिवा काळे म्हणाले.

