ETV Bharat / state

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन; 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन झालं आहे. आज दुपारी पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Suresh Kalmadi
सुरेश कलमाडी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 8:45 AM IST

|

Updated : January 6, 2026 at 9:03 AM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं आज मंगळवारी (6 जानेवारी) दीर्घ आजारानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते आणि घरीच उपचार घेत होते. आज सकाळी पुण्यातील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई तसेच, नातवंडं असा परिवार आहे. त्यांचं पार्थिव आज दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील एरंडवणे येथील कलमाडी हाऊस येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता नवी पेठ, पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

1944 सालचा जन्म : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमध्ये झालं, तर उच्च शिक्षण त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यांनी 1960 साली नॅशनल डिफेन्स अकॅडमीत प्रवेश घेतला.

1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. याच काळात त्यांनी 1965 आणि 1971 च्या भारत–पाकिस्तान युद्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. भारतीय वायू सेनेत कार्यरत असतानाच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पुण्यात काँग्रेस संघटनेची धुरा सांभाळत पक्ष वाढीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.

Suresh Kalmadi
सुरेश कलमाडी (ETV Bharat)

पुणे पॅटर्नचे जनक : माजी खासदार सुरेश कलमाडी हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तसेच, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्षही होते. पुणे शहरात काँग्रेस पक्षाची वाढ करण्यास सुरेश कलमाडी यांचा मोठा वाटा होता. पुणे पॅटर्न तसेच पुणे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवसारख्या अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात मोलाची भूमिका : 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे त्यांना अटकही झाली होती. पुणे शहरातील नेतृत्व आणि राजकीय समीकरणं सांभाळण्यातही कलमाडी अग्रेसर होते. पुणे पॅटर्नसारख्या उपक्रमांसह त्यांनी राबविलेल्या कामांची आजही चर्चा होते. त्यांच्या निधनानं काँग्रेस पक्षाला तसेच, पुणे शहरात मोठा धक्का बसला आहे.

Suresh Kalmadi
सुरेश कलमाडी (ETV Bharat)

सबसे बड़ा खिलाड़ी... सुरेश कलमाडी : पुणे शहराच्या राजकारणात 30 वर्षांपेक्षा जास्त काळ आपलं अधिराज्य गाजवणारे सुरेश कलमाडी यांना 'सबसे बड़ा खिलाडी' अशी टॅगलाईन मिळाली होती. 1982 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली आणि ती जिंकली. त्यानंतर, जवळपास 30 वर्षे सुरेश कलमाडी हे पुण्याचे खासदार राहिले.

या 30 वर्षांच्या कालावधीत त्यांनी पुण्यात काँग्रेस वाढवली आणि आपलं राजकीय वर्चस्व राखून ठेवलं. एवढंच नाही, तर त्यावेळी त्यांनी मोठ्या पवारांनाही अर्थात शरद पवार यांना काही काळ पुण्यात रोखून ठेवलं होतं.

नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात रेल्वे राज्यमंत्री : भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात कलमाडी यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलं. पुण्यातील सत्ताकेंद्र त्याकाळी 'कलमाडी हाऊस' होता आणि तिथं नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी असायची. परंतु, 2010 मध्ये त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर झालेल्या शिक्षेमुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली.

Suresh Kalmadi
सुरेश कलमाडी (ETV Bharat)

संस्कृतिक क्षेत्रात देखील मोठं काम : पुण्यातील गणेश उत्सव जगभर प्रसिद्ध आहे, आणि या गणेशोत्सवाबरोबरच सुरेश कलमाडी यांनी 'पुणे फेस्टिव्हल' सुरू करून पुणे शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात नवा आयाम जोडला. त्यांनी या महोत्सवात जगभरातील कलाकारांना आमंत्रित करून पुण्यात एक अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक महोत्सव उभा केला, जो आजही पुणे शहराचं एक महत्त्वाचं सांस्कृतिक प्रतीक बनलेला आहे.

पुणे फेस्टिव्हलमध्ये अनेक नामवंत कलाकार आले आणि त्यांची कला सादर केली. यामुळे पुणे फेस्टिव्हलला एक खास ओळख मिळाली. आजही कलमाडी यांच्या नावावरच या महोत्सवाचं आयोजन होत आहे, आणि त्यांचं हे योगदान आजही पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात लक्षात घेतलं जातं.

कार्यकर्त्यांना दिली मोठी ताकद : पुणे शहरात 30 वर्ष खासदार असताना सुरेश कलमाडी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली. त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत असलेला प्रत्यक्ष संवाद आणि त्यांना दिलेल्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली होती.

सुरेश कलमाडी जेव्हा दिल्लीहून पुणे विमानतळावर येत, तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होत असे. त्यावेळी ते प्रत्येक कार्यकर्त्याशी व्यक्तिगतपणे संवाद साधत, त्यांची विचारपूस करत आणि त्याला प्रोत्साहन देऊन त्याची ताकद वाढवण्याचं काम करत. आजही काँग्रेस पक्षात कलमाडी गट म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते आहेत.

हेही वाचा

Last Updated : January 6, 2026 at 9:03 AM IST