ETV Bharat / state

साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरेंची साई चरणी मोठी देणगी; 46 लाखांचे सुवर्ण ॐ अक्षरांची देणगी

मुंबईतील डॉ. सुरेश हावरे हे शिर्डी साईबाबांचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी ते पत्नीसमवेत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते.

Dr. Suresh Haware's big donation to Sai Charan
डॉ. सुरेश हावरेंची साई चरणी मोठी देणगी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 4, 2026 at 4:57 PM IST

|

Updated : March 4, 2026 at 6:00 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त साईबाबांच्या चरणी मोठी देणगी अर्पण केलीय. तब्बल 309.500 ग्रॅम वजनाची सोन्याची सहा ॐ अक्षरे त्यांनी अर्पण केली असून, या देणगीची एकूण किंमत सुमारे 46 लाख रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या वतीने देण्यात आलीय. मुंबईतील डॉ. सुरेश हावरे हे शिर्डी साईबाबांचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी ते पत्नीसमवेत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यावेळी त्यांनी सामान्य भाविकांच्या रांगेत उभे राहून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

डॉ. सुरेश हावरेंची साई चरणी मोठी देणगी (Source- ETV Bharat)

डॉ. सुरेश हावरे यांचे संपूर्ण कुटुंब साईभक्त : रांगेतील गर्दी आणि धक्काबुक्कीचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा साईबाबांच्या दर्शनासाठी येणार नाही, असा त्यांनी निर्धार केला होता. मात्र साईकृपेने पुढे त्यांचीच नियुक्ती साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी झाली. अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना भाविकांच्या सुविधांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती डॉ. हावरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली. डॉ. सुरेश हावरे यांचे संपूर्ण कुटुंब साईभक्त असून, ते दर दोन-तीन महिन्यांनी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. दोन महिन्यांपूर्वी दर्शनासाठी आले असता त्यांनी साईबाबांच्या मूर्तीमागील श्रद्धा-सबुरी हे सुवर्ण अक्षरे पाहिले.

त्या ठिकाणी सुवर्ण ॐ अर्पण करण्याचा संकल्प : मात्र त्याच्या शेजारील मोकळ्या जागेकडे लक्ष गेल्यानंतर आपल्या वाढदिवशी त्या ठिकाणी सुवर्ण ॐ अर्पण करण्याचा संकल्प त्यांनी केला. या जागेत किती ॐ अक्षरे बसू शकतील, याचा अंदाज त्यांनी साई संस्थानकडून घेतला. त्यानुसार 309.500 ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सहा सुवर्ण ॐ अक्षरे अर्पण केली. या सुंदर आणि कलात्मक सुवर्ण दानाची एकूण किंमत 46 लाख 9 हजार 74 रुपये इतकी असल्याची माहिती डॉ. हावरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.

साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन : डॉ. सुरेश हावरे यांनी पत्नीसह शिर्डीत येऊन काल रात्री साईबाबांच्या शेजआरतीस हजेरी लावली. तसेच आज पहाटेच्या काकड आरतीलाही उपस्थित राहून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन डॉ. हावरे दाम्पत्याचा सत्कार केला.

हेही वाचाः

'मध्यपूर्वेत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच आणणार मायदेशी' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले 'एकनाथ शिंदे . . .'
नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांना राज्यसभेची लॉटरी; भाजपाकडून मिळाली उमेदवारी

Last Updated : March 4, 2026 at 6:00 PM IST