अहिल्यानगरच्या माजी महापौरावर बलात्काराचा गुन्हा दाखल, नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या कळमकर फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Published : February 22, 2026 at 3:35 PM IST
अहिल्यानगर : शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शाळेत नोकरी लावण्याचं आमिष : फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार, कळमकर यांनी शाळेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तिला संपर्कात ठेवलं. त्यानंतर अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन त्याच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीत काय? : पीडितेनं सततचा मानसिक आणि शारीरिक छळ सहन न झाल्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. तिनं आरोप केला की, आरोपीनं मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडलं आणि प्रचंड त्रास दिला. तसेच आरोपीनं अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग केल्याचेही गंभीर आरोप पीडितेनं केले आहेत. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ पुरावे पीडितेनं पोलिसांकडे जमा केले आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी महापौर कळमकर सध्या फरार आहेत. गुन्हा दाखल होताच ते पळून गेले असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नगर शहरात संतापाची लाट पसरली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
*महिलांच्या सुरक्षेवर राजकारण नाहीच… पण राजकीय संरक्षण खपवून घेणार नाही*
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 21, 2026
अहिल्यानगरमधील शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर असलेल्या अभिषेक कळमकर ने जे काळं कृत्य केलं त्याला माफी नाही… त्याला कायद्यानुसार शिक्षा होईलच….
पण आज माझा थेट प्रश्न १२मतीच्या मोठठ्या…
प्रकरणावर भाजपा आक्रमक : दरम्यान, आता या प्रकरणात भाजपा आक्रमक झाली आहे. विधान परिषदेच्या सदस्या आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, महिलांच्या सुरक्षेवर राजकारण नाहीच. पण राजकीय संरक्षण खपवून घेणार नाही. अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर असलेल्या अभिषेक कळमकरनं जे काळं कृत्य केलं त्याला माफी नाही. त्याला कायद्यानुसार शिक्षा होईलच,' अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, 'आज माझा थेट प्रश्न बारामतीच्या मोठ्या ताईंना आहे. महिलांच्या सन्मानावर मोठमोठी भाषणं करणाऱ्या आज गप्प का? त्या नराधमाला तुमच्या पक्षातून तत्काळ बडतर्फ करणार नाही का? लक्षात ठेवा, मौन हे देखील सहकार्यासारखंच असतं. हा फक्त एका मुलीचा प्रश्न नाही. हा महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे', अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वााच
- बलात्कार पीडितेवर अपत्याच्या शालेय प्रमाणपत्राकरिता वडिलांच्या नावासह जात लावण्याची सक्ती करता येणार नाही-हायकोर्ट
- भावाचा सख्ख्या बहिणीवर वारंवार बलात्कार, न्यायालयानं सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
- गुंतवणूक करताना ज्येष्ठ नागरिकाची ४ कोटींची फसवणूक; पैसे मागताच महिलेच्या साथीदारानं दिली बलात्कार गुन्ह्याची धमकी

