'नरेंद्र-देवेंद्र महोत्सवा'त अशोक चव्हाण यांना 'नांदेड भूषण' पुरस्कार; कर्जमाफीवर सरकारची भूमिकादेखील केली स्पष्ट
यंदाचा 'नांदेड भूषण' पुरस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. हा प्रतिष्ठेचा सन्मान सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.

Published : February 23, 2026 at 1:20 PM IST
नांदेड : इथं आयोजित 'नरेंद्र आणि देवेंद्र महोत्सवा'त यंदाचा 'नांदेड भूषण' पुरस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सन्मान सोहळा रविवारी (22 फेब्रुवारी) उत्साहात पार पडला. 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या या महोत्सवाला मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली.
खासदार अशोक चव्हाण काय म्हणाले? : पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार अशोक चव्हाण यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. विरोधकांच्या भूमिकेत कोणतंही तर्क दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. अधिवेशनात चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं सांगत चहापानावर बहिष्कार टाकण्याची प्रथाच पडल्याचं त्यांनी नमूद केलं.
अजित पवारांची भूमिका हीच शासनाची अधिकृत भूमिका : कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना अशोक चव्हाणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी मांडलेली भूमिका हीच शासनाची अधिकृत भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. शासनाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढणं आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. तसेच, आपण सध्या संसदेमध्ये कार्यरत असल्यानं राज्य विधिमंडळातील घडामोडींची थेट माहिती नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरवर्षी पुरस्काराचं आयोजन : दरम्यान, 'नांदेड भूषण' पुरस्कार दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिला जातो. रविवारी पार पडलेल्या या सोहळ्यास मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान कविसंमेलनही आयोजित करण्यात आलं होतं.
या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून शिवप्रसाद राठी यांनी जबाबदारी सांभाळली, तर संकल्पना व आयोजन अॅड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून करण्यात आलं. सांस्कृतिक कार्यक्रम आणि कविसंमेलनामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. राज्यासह देशभरातील मराठी व हिंदी कवींनी आपल्या काव्यरचना सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
हेही वाचा

