ETV Bharat / state

धो धो पावसातही वन कर्मचाऱ्यांकडून जंगलाची राखण; जारिदा वनपरिक्षेत्रात महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची अविरत गस्त

वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच अवैध वृक्षतोड, शिकारीचे प्रयत्न आणि इतर बेकायदा हालचाली रोखण्याची जबाबदारी वनकर्मचाऱ्यांवर आहे. त्याचाच आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शशांक लावरे यांनी घेतलाय.

Forest workers protect the forest even in heavy rain
धो धो पावसातही वन कर्मचाऱ्यांकडून जंगलाची राखण (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 27, 2026 at 12:46 PM IST

|

Updated : August 27, 2026 at 2:52 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती- मेळघाटच्या जंगलावर सध्या पावसाळ्याची हिरवी चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. डोंगरदर्‍यातून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्यानं अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि जंगलातील पायवाटा चिखलानं निसरड्या झाल्या आहेत. मात्र या सगळ्या आव्हानांमध्येही सिपला वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील जारीदा वनपरिक्षेत्रात ऊन असो, पाऊस असो अथवा हिवाळ्याची कडाक्याची थंडी जंगलाच्या सुरक्षेसाठी वन कर्मचाऱ्यांची पावलं वर्षभर जंगलात पडत असतात. जारिदा परिसरातील दुर्गम जंगलात महिला आणि पुरुष वन कर्मचारी खांद्याला खांदा लावून गस्त घालत आहेत. जंगलातील वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच अवैध वृक्षतोड, शिकारीचे प्रयत्न, वन जमिनीवरील अतिक्रमण आणि इतर बेकायदा हालचाली रोखण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर आहे.


पावसात पायवाटा निसरड्या तरीही गस्त सुरूच : पावसाळ्यात मेळघाटच्या जंगलातील परिस्थिती काहीशी वेगळी असते. उन्हाळ्यात धुळीनं भरलेल्या पायवाटा पावसात चिखलानं माखतात. डोंगर उतारावरून पाणी वेगानं खाली येतं, तर अनेक ओढे, नाले अचानक भरून वाहतात. त्यामुळं वाहनानं जंगलाच्या प्रत्येक भागात पोहोचणं शक्य होत नाही. अशावेळी वन कर्मचाऱ्यांना पायीच जंगलात मोठा परिसर पिंजून काढावा लागतो. निसरड्या वाटा, दाट झाडी आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे गस्तीचं अंतर पार करणे हीच मोठी कसोटी असते. त्यातच जंगलात वन्य प्राण्यांचा वावर असल्यानं रस्त्यानं प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावं लागतं. वनसंरक्षण आणि वन्यजीव संवर्धन हे वनविभागाचं प्रमुख काम आहे. हे काम वर्षातील कोणत्याही ऋतूत थांबत नाही. मात्र पावसाळ्यात जंगलात वाहन पोहोचत नसल्याने पायी गस्त घालण्याचा आव्हान वाढतं. याच काळात वन जमिनीवर अतिक्रमणासारख्या बाबींवरही लक्ष ठेवावं लागतं, असं जारिदा वनपरिक्षेत्राचे वनपाल अविनाश मते "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हणाले.

Forest workers protect the forest even in heavy rain
धो धो पावसातही वन कर्मचाऱ्यांकडून जंगलाची राखण (Source- ETV Bharat)

महिला वन कर्मचारी जंगलाच्या सुरक्षेसाठी आघाडीवर : संपूर्ण मेळघाटात महिला वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही जंगल संरक्षणातील महत्त्वाचा भाग ठरत आहे. महिला कर्मचारी पुरुष सहकाऱ्यांसोबत जंगलगस्त, कॅम्पवरील ड्युटी आणि गरजेनुसार रात्रीच्या गस्तीची जबाबदारी पार पाडत आहेत. वनविभागात काम करताना महिला आणि पुरुषाचा भेद केला जात नाही, असं खंडूखेडा येथील वनपाल मयुरी देशमुख" ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हणाल्या. जंगल संरक्षणाची जबाबदारी सर्व कर्मचारी समानपणे पार पाडतात. सुरुवातीला दुर्गम जंगलात काम करताना काही अडचणी येतात, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळं वन कर्मचाऱ्यांना त्या अडचणींवर मात करता येते. पावसाळ्यात जंगलातील कॅम्पवर साधारणपणे दोन महिला कर्मचारी असतात. कॅम्पवर ड्युटी करणं, जंगलात गस्त घालणं, रात्रीची पेट्रोलिंग करणं किंवा जंगलातील आग विझवण्यासाठी धाव घेणे अशा विविध जबाबदाऱ्या महिला कर्मचारीसुद्धा पार पाडत आहेत. जंगल गस्तीच्या वेळी वन्य प्राण्यांचे दर्शनही अनेकदा घडतं, असं मयुरी देशमुख सांगतात.

धो धो पावसातही वन कर्मचाऱ्यांकडून जंगलाची राखण (Source- ETV Bharat)

जंगलातील प्रत्येक हालचालींवर नजर : जंगलातील गस्त म्हणजे केवळ वन्य प्राणी पाहण्यापूर्ती मर्यादित नसते. गस्तीच्या वेळी वन कर्मचारी वन्य प्राण्यांचे ठसे, विस्टा, ओरखडे, हालचालींच्या खुणा तसेच पाणवठे आणि प्राण्यांच्या वाटांची पाहणी करतात. याशिवाय जंगलात मानवी हस्तक्षेप वाढला आहे का, अवैध वृक्षतोड किंवा शिकारीचे कोणतेही प्रयत्न झाले आहेत का, वन्य जमिनीवर अतिक्रमण होत आहे का? यावरही लक्ष ठेवलं जातं. संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाते, असं जारिदा येथील वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप बोडखे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.

Forest workers protect the forest even in heavy rain
धो धो पावसातही वन कर्मचाऱ्यांकडून जंगलाची राखण (Source- ETV Bharat)

पावसाळ्यात कॅम्प बनतो दुसरं घर : जारिदा आणि एकूणच मेळघाटच्या दुर्गम भागातील संरक्षण छावण्या वन कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठिकाण आहेत. दिवसभर जंगलात गस्त घातल्यानंतर पावसामुळे किंवा दुर्गम अंतरामुळं मुख्यालयात परतणं शक्य नसल्यास कर्मचाऱ्यांना याच कॅम्पवर मुक्काम करावा लागतो. कॅम्पवर पिण्याचं पाणी, पाणी साठवण, स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य, मच्छरदाण्या, ब्लँकेट, फिल्ड किट आणि प्राथमिक उपचाराची साहित्य अशा मूलभूत सुविधांची व्यवस्था केली जाते. जंगलाच्या आतील भागात कर्मचारी सतत उपलब्ध राहावेत आणि कोणतीही घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी या कॅम्पची भूमिका महत्त्वाची ठरते, असं अविनाश मते म्हणाले.

Forest workers protect the forest even in heavy rain
धो धो पावसातही वन कर्मचाऱ्यांकडून जंगलाची राखण (Source- ETV Bharat)

अतिक्रमण रोखण्याचंही पावसाळ्यात आव्हान : पावसाळ्यात जंगलात हिरवाई वाढत असली तरी वनविभागाची जबाबदारी कमी होत नाही. वन जमिनीवरील अतिक्रमण, अवैध वृक्षतोड आणि जंगलातील इतर बेकायदा हालचालींवर या काळातही लक्ष ठेवावे लागते. अशा कारवाया रोखण्यासाठी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळतं. दुर्गम भागात प्रत्यक्ष पोहोचून परिस्थितीची पाहणी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत असते, असंदेखील अविनाश मते म्हणाले.

Forest workers protect the forest even in heavy rain
धो धो पावसातही वन कर्मचाऱ्यांकडून जंगलाची राखण (Source- ETV Bharat)

संशयास्पद हालचालींवर तातडीनं प्रतिसाद : जंगलात एखादी अवैध हालचाल किंवा संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं माहिती दिली जाते. महिला आणि पुरुष कर्मचारी असलेल्या पथकांना परिस्थितीनुसार जंगलात पाठविला जातं. विशेषतः दुर्गम भागात अवैध प्रकार घडल्याची माहिती मिळाल्यास वनकर्मचारी तातडीना घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जंगलाच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष जंगलात असलेली ही गस्तीची यंत्रणा महत्त्वाची ठरते.

उन्हाळ्यात आग आणि पावसाळ्यात चिखलाची परीक्षा : मेळघाटमध्ये उन्हाळ्यात जंगलातील आगीचा धोका मोठा असतो. त्यासाठी फायर लाईन, फायर वॉचिंग आणि आग लागल्यास तातडीच्या प्रतिसादाची तयारी केली जाते. पावसाळ्यात आगीचा धोका तुलनेनं कमी असला तरी गस्तीसमोर नवं आव्हान उभं राहतं. चिखलानं भरलेल्या पायवाटा, निसरडे डोंगर, उतार, भरून वाहणारे एवढे नाले आणि सततचा पाऊस यामुळं जंगलात पोहोचणं कठीण होतं. तरीही वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरूच राहते. जंगल हिरवगार दिसत असलं तरी त्याच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष जंगलात उपस्थित राहणाऱ्या वन कर्मचाऱ्यांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते.

हेही वाचाः

गोवा मुक्तिसंग्रामातील एकाचेही नाव वगळू नका; केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन

प्रियकरासोबत गेली फिरायला, घरी आला प्रेयसीचा मृतदेह : अल्पवयीन तरुणीच्या मृत्यूचं गूढ कायम; पालघरला हादरा

Last Updated : August 27, 2026 at 2:52 PM IST