स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे चॅट डिलीट करायला लावणे म्हणजे हुकूमशाही; सतेज पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेतले जाताहेत, त्यांचे चॅट डिलीट केले जाताहेत. हे म्हणजे हुकूमशाही कडे वाटचाल असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटलांनी केलाय.


Published : January 2, 2026 at 3:53 PM IST
कोल्हापूर : राज्याच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिराती उशिरा निघाल्या आहेत, याचा फटका ज्यांचं वय बसत नाही, अशा परीक्षार्थींना बसत आहे. कालपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर आहेत. गेल्या आठ-दहा दिवस हा प्रश्न प्रलंबित आहे, काल मुख्यमंत्र्यांनादेखील विनंती केलीय, 4 जानेवारीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी विनंतीदेखील मी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. विद्यार्थी आज पुण्यात रस्त्यावर आहेत, पोलीस त्यांच्यावर दबाव आणत आहेत, त्यांच्या सोशल मीडियावरील मेसेज डिलीट करायला लावले आहेत. विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेतले जाताहेत, त्यांचे चॅट डिलीट केले जाताहेत. हे म्हणजे हुकूमशाही कडे वाटचाल असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
वीज दरवाढ तांत्रिकदृष्ट्या चुकीची : राज्यातील वीज ग्राहकांवरील अवास्तव वीजदर मागे घेण्यासंदर्भात NERC ने सूचना दिली होती, पण राज्य सरकारने ते परत बदलले, त्यांनी दुसरी दरवाढ केलीय. त्यामध्ये NERC, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हा विषय गेला, त्यावेळेला हा विषय थांबला. पण पुन्हा एकदा आजपासून नागपूर, पुणे, नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू झालीय. महाराष्ट्रातील जनतेने या सुनावणीला उपस्थित राहून प्रस्तावित वीजदरवाढ थांबवावी. 8 जानेवारीला पुणे इथं पश्चिम महाराष्ट्रासंदर्भातील सुनावणी आहे, याला मी स्वतः उपस्थित राहणार आहे. वीज दरवाढ तांत्रिकदृष्ट्या कशी चुकीची आहे, ते आम्ही पटवून देण्याचे काम निश्चित करू, असंही आमदार सतेज पाटील यावेळी म्हणाले.
भाजपाची नेहमीच दुटप्पी भूमिका : मुंबईच्या महापौरपदासंदर्भात कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यात आता त्यांचा यू-टर्न दिसून येतो, भाजपाची नेहमीच दुटप्पी भूमिका दिसून आलीय. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी एका नेत्याने एक वक्तव्य करायचे, दुसरा नेत्याने त्याचे खंडन करायचे, मीडिया स्पेस स्वतःकडे राहील, दोन्ही घटकांना फायदा करून आपल्याला निवडणुकीत याचा वापर करता येतं का? हे भाजपा नेहमी पाहत आहे. मराठा समाज, ओबीसी आंदोलन असेल यामध्ये सरकारचा प्लॅन एकाने एका बाजूने बोलायचं दुसऱ्याने दुसऱ्या बाजूने बोलायचं, असाच राहिला आहे. पण मुंबईमध्ये याचा फार फरक पडणार नाही. मुंबईमध्ये मराठी माणूसच महापौर होईल, असंही सतेज पाटील म्हणालेत.
राज्यात फक्त 9 ठिकाणी महायुतीची युती : 'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं' हा माझा डेव्हलपमेंट प्लॅन आहे. जाहीरनामा तयार करण्यासाठी आम्ही मोहीम हातात घेतलीय. कोल्हापूरकरांनी सांगावं त्यांच्या मनातील भावना काय आहेत, प्रशासकाच्या माध्यमातून कोल्हापूर महापालिकेवर सरकारची सत्ता आहे. या तीन वर्षांत काय झालं? कोल्हापुरात 100 कोटींच्या रस्त्यांची धूळधाण काय झाली हे कोल्हापूरची जनता बघत आहे. आम्ही पॉझिटिव्ह अँगलने घेत आहोत, ते टीका करतायेत काही हरकत नाही. पण आम्ही पॉझिटिव्ह अँगलने पुढची 15 दिवस आम्ही घेऊन जाणार आहोत. राज्यात फक्त 9 ठिकाणी महायुतीची युती झालीय. ज्या ठिकाणी प्रबळ विरोधक आहेत, त्या ठिकाणी यांना हातात हात घातल्याशिवाय पर्याय नाही, यांचे स्वतंत्र लढण्याचे धाडस नाही. चंद्रपूर असो कोल्हापुरात असो. ज्या ठिकाणी ताकद मोठी आहे, तिथे ते एकटे लढायचे धाडस करत नाहीत. आमचे उमेदवार सक्षम आहेत म्हणून आम्ही 48 उमेदवारांची नावे आधीच जाहीर केलीत, दुसरी यादी जाहीर केली, तुमचे उमेदवार सक्षम असते आणि तुमच्या उमेदवारावर तुमचा विश्वास असता तरी आधी न जाहीर करता नवी प्रथा महायुतीमध्ये सुरू असल्याचा पलटवारही आमदार सतेज पाटलांनी केलाय.
हेही वाचाः
'युती, आघाडीशी पुणेकरांना...'; थेट विधान करत आबा बागुल यांनी विजयाचा व्यक्त केला विश्वास

