छत्रपती संभाजीनगरात एफडीएची धडक मोहीम; दोन नामांकित हॉटेल्ससह ज्यूस सेंटरवर कारवाई
अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' या मोहिमेंतर्गत राज्यभरात कारवाई करण्यात येत आहे.

Published : July 3, 2026 at 5:01 PM IST
छत्रपती संभाजीनगर : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार सांभाळताच अन्न आणि औषधी प्रशासन विभागानं चांगलीच कात टाकल्याचं दिसतय. मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध भागात तपासणी सुरू करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये दोन नामांकित हॉटेल आणि एका ज्यूस सेंटरवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पहिल्या दिवशी कांचनवाडी येथील 'आईच्या गावात' आणि गजानन महाराज रस्त्यावर असणाऱ्या 'याल्ला याल्ला' या नामांकित हॉटेलवर, तर पैठण गेट येथील सर्वात जुने असणाऱ्या 'लकी ज्यूस सेंटर'वर कारवाई करण्यात आली आहे.
अशा स्थितीत दर्जेदार खाद्यपदार्थ न देणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, हॉटेल व्यावसायिकांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात आणखी कारवाई सुरू राहील असा इशारा अन्न औषध प्रशासन अधिकारी श्रीकांत करकळे यांनी दिला.
शहरातील हॉटेलची तपासणी : अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' या मोहिमेंतर्गत 23 जून 2026 रोजी दिलेल्या निर्देशानुसार राज्यभरासह छत्रपती संभाजीनगर इथं मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. विभागामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, इतर अन्न आस्थापनांवर धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. विशेषतः नामांकित आस्थापनांवर तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी शहरातील कांचनवाडी येथील प्रसिद्ध अशा हॉटेल 'आईच्या गावात' या शाकाहारी हॉटेलमध्ये तपासणी करण्यात आली. त्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2026 नुसार महत्वाच्या नियमांचं उल्लंघन आढळून आलं. अन्न औषध प्रशासनानं रेस्टॉरंटचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. हॉटेल तपासणीत स्वयंपाक घरातील अन्न पदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी बुरशी लागलेले आंबे, इतर पदार्थ वापरासाठी ठेवलेले आढळले. भाज्या तयार करण्यासाठी वापरत येणारी ग्रेव्ही न झाकताच उघड्यावर ठेवलेली आढळली.
चुकीच्या पद्धतीनं दिले जात होते पदार्थ : तपासणीवेळी हॉटेलच्या मेनूकार्डमध्ये बटर तंदूर रोटी, बटर नान विक्रीसाठी असल्याचं नमूद आहे. बटरबाबत विचारणा केली असता त्यांनी "न्यूट्रेलाइट प्रोफेशनल फॅट स्प्रेड" (Nutralite Professional fat Spread) वापरत असल्याचं सांगितलं. त्याचाच वापर करून बटर तंदूर रोटी, बटर नान तयार करून लोकांची फसवणूक केल्याचं आढळलं. हॉटेलमध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पालेभाज्या या शिळ्या, बुरशी लागलेल्या असल्याचं निदर्शनास आलं. या ठिकाणी अन्न पदार्थ साठवण्यासाठी "फूड ग्रेड मटेरियल" वापरलं गेलं नव्हतं. अन्न पदार्थ आणि कचारापेटी एकाच ठिकाणी ठेवल्याचं आढळून आलं. अशा अनेक बाबी निदर्शनास आल्यानंतर कारवाई करून परवाना रद्द केल्याची माहिती अन्न औषध अधिकारी श्रीकांत करकळे यांनी दिली.
हॉटेलमध्ये कृत्रिम रंगाचा वापर : गजानन महाराज मंदिर रोडवरील याल्ला याल्ला या हॉटेलवर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये दररोज प्रचंड गर्दी असते. दररोज ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा आढळून आली नाही, शिवाय चायनीज किंवा मांसाहार भोजनात कृत्रिम रंगाचा वापर करण्यात येत होता. शरीरासाठी अपायकारक असणाऱ्या रंगांचा वापर असल्यानं तातडीने सदरील रंग नष्ट करण्यात आले. भाज्यादेखील ताज्या आढळून आल्या नसल्यानं कारवाई केल्याची माहिती अन्न व औषध विभागाचे अधिकारी श्रीकांत करकळे यांनी दिली.
ज्यूस सेंटरवर पहिल्यांदाच कारवाई : छत्रपती संभाजीनगर शहारातील पैठण गेट परिसरातील प्रसिद्ध अशा 'लकी ज्यूस सेंटर' इथं गुरुवारी रात्री उशिरानं धाड टाकून तपासणी करण्यात आली. कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांच्या पथकाला मुदतबाह्य टोन्ड दूध, अल्फान्सो मॅन्गो पल्प ज्यूस तयार करण्यासाठी वापरला जात असल्याचं आढळलं. हा साठा तत्काळ नष्ट करण्यात आला. तसंच आईस्क्रीमऐवजी फ्रोजन डेझर्टचा वापर, अस्वच्छता आढळून आली. संबंधित व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तपासणी अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, अशी माहिती अन्न व औषधी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हॉटेल व्यावसायिकाने मांडली भूमिका : कारवाई झाल्यावर 'आईच्या गावात' हॉटेलचे अक्षय जैस्वाल यांनी आम्ही ग्राहकांची काळजी घेतो, कोबी खराब असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र बाजारातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणताना सदरील कोबी घासली गेली होती, खराब असलेला भाजीपाला आम्ही लगेच बाजूला काढून टाकतो. त्यामुळे काहीतरी गैरसमज झाला असावा. शिवाय पिण्यासाठी आम्ही पाणी उपलब्ध करून देतो, बंद बाटली कोणी मागितली तरच देतो, असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलं.
हेही वाचा

