ETV Bharat / state

आळंदीत इंद्रायणीला महापूर, सद्यस्थितीत वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये; देवस्थान अन् पोलीस यंत्रणा सतर्क

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं प्रशासन, देवस्थान आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Flooding of the Indrayani River in Alandi
आळंदीत इंद्रायणीला महापूर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 6, 2026 at 9:10 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

आळंदी (पुणे) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आळंदीकडे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी आणि भाविकांनी, आहे त्या ठिकाणीच थांबावं, आळंदीकडे येण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन पालखी सोहळा प्रमुख तथा देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांनी केलं आहे.

देवस्थान आणि पोलीस यंत्रणा सतर्क : इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं प्रशासन, देवस्थान आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठच्या परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून मंदिर परिसरातील परिस्थितीवरही बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी थेट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

आळंदीत इंद्रायणीला महापूर (ETV Bharat)

सद्यस्थितीत वारकऱ्यांना आळंदीत प्रवेश नाही : पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. मात्र सध्याची पूरस्थिती लक्षात घेता अनेक वारकऱ्यांना आणि भाविकांना आळंदीत प्रवेश नाकारून माघारी पाठविण्यात येत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही कोणीही जीव धोक्यात घालून पूल किंवा नदीकाठच्या भागात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आळंदी नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या धोकादायक भागात प्रवेश बंद करण्यात आला असून नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

यंदाच्या पावसामुळे आळंदी परिसरात मोठं नुकसान : यंदाच्या पावसानं आळंदी परिसरात मोठं नुकसान केलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक व्यापारी, लहान व्यावसायिक आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन उपजीविकेवरही या अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असताना निसर्गाच्या या रौद्ररूपामुळे सर्व नियोजनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, पुढील काही तासांतील पावसाची स्थिती आणि इंद्रायणी नदीची पाणीपातळी लक्षात घेऊन पालखी सोहळ्यासंदर्भातील पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा

  1. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याची परिस्थिती काय? पाहा व्हिडिओ
  2. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 24 तासांपासून ठप्प; हजारो वाहने अडकली, प्रवाशांनी व्यक्त केला संताप
  3. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम; पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली, 55 बंधारे पाण्याखाली