ETV Bharat / state

मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा पहिला बळी, झाड कोसळून जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

मिरा भाईंदरचे माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा मुलगा राहुल पाटील दुचाकीवरून प्रवास करत असताना नारळाचं झाड त्याच्या अंगावर कोसळलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा पहिला बळी
मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा पहिला बळी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 3, 2026 at 4:17 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मिरा भाईंदर - पावसाळ्यातील पहिला बळी गेल्याची घटना शुक्रवारी मिरा भाईंदर मध्ये घडली. काही दिवसांपूर्वी अंगावर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार राहुल पाटील वय वर्ष 33 याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या तरुणाचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महापालिकेच्या धोकादायक झाडांबाबतच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


राहुल पाटील (वय ३३) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो मूर्धा गावातील मूळ रहिवासी होता. तसंच मिरा भाईंदरचे माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष अशोक पाटील यांचा तो मुलगा होता. मंगळवारी दुपारी राहुल पाटील दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक नारळाचं झाड त्याच्या अंगावर कोसळलं. या अपघातात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

मागील आठवड्यापासून शहरात रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरू असून अद्याप अतिवृष्टी झालेली नाही. तरीही विविध भागात झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. धोकादायक झाडांचं वेळेत सर्वेक्षण तसंच छाटणी न झाल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. झाड कोसळून एका तरुणाचा बळी गेल्यानं महापालिकेच्या कार्यपद्धतीविरोधात संताप व्यक्त केला जात असून धोकादायक झाडांवर योग्य त्या पद्धतीनं कापणी करुन धोका टाळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईत अशाच प्रकारे स्कूल बसवर झाड पडून मुलचा मृत्यू झाला होता. त्यामुळे झाडांची छाटणी आणि धोकादायक झाडं पाडण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा...

  1. पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकात झाड कोसळलं; मुलगी थोडक्यात बचावली, घटनेचा सीसीटीव्ही समोर
  2. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, चार विद्यार्थी जखमी