ETV Bharat / state

गरोदर महिलांसाठी ग्रहण खरंच धोकादायक असतं का? 'अंनिस'नं केला खुलासा

चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणाऱ्या भारताच्या नागरिकांनी अंधश्रद्धेचं ग्रहण झटकून द्यावं, असं आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलं आहे.

First Lunar Eclipse of 2026
गरोदर महिलांसाठी ग्रहण खरंच धोकादायक असतं का? (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 3, 2026 at 1:44 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा : यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण मंगळवारी (३ मार्च) होत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध अतिरंजित आणि अवैज्ञानिक दावे पसरवले जात आहेत. ग्रहणाचा गर्भवती महिलांच्या पोटातील बाळावर दुष्परिणाम होतो, अशा अंधश्रद्धाही प्रसारित केल्या जात आहेत.

याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) नं प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ग्रहण ही केवळ खगोलशास्त्रीय घटना असून तिचा मानवी जीवनावर कोणताही दुष्परिणाम होत नाही, असं अंनिसनं स्पष्ट केलं आहे. तरीही सोशल मीडियावर ग्रहणाबाबत भीतीदायक आणि दिशाभूल करणारे संदेश प्रसारित केले जात आहेत.

गरोदर महिलांसाठी ग्रहण खरंच धोकादायक असतं का? (ETV Bharat)

ग्रहणाच्या दिवशी अंधश्रद्धांचा महापूर : गर्भवती महिलांनी ग्रहणकाळात एका जागीच बसावं, पाणी पिऊ नये किंवा मलमूत्र विसर्जन करू नये, असे अवैज्ञानिक सल्ले दिले जात असल्याचंही 'अनिंस'नं नमूद केले आहे. अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनानं कठोर कारवाई करावी, अशी मागणी 'अंनिस'नं केली आहे.

चंद्रग्रहण केवळ खगोलीय घटना : चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलीय घटना आहे. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य दर 6 महिन्यांनी साधारणपणे एका सरळ रेषेत आल्यावर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि हा सावल्यांचा खेळ म्हणजे चंद्रग्रहण होय. या प्रक्रियेत कोणतीही विशेष ऊर्जा किंवा हानिकारक किरणं निर्माण होत नाहीत.

ग्रहणाच्या काळात अन्न सेवन करणं, बाहेर फिरणं किंवा दैनंदिन व्यवहार करणं यात कोणतीही अडचण नसते आणि त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही, असे महाराष्ट्र 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'नं आपल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.

First Lunar Eclipse of 2026
चंद्रग्रहण (ETV Bharat)

'ग्रहणाचा गर्भवती महिलांवर कोणताही परिणाम होत नाही' : सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अवैज्ञानिक सल्ल्यांमुळे तीन वर्षांपूर्वी साताऱ्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, याचीही समितीनं आठवण करून दिली आहे. ग्रहणाचा गर्भवती महिलांवर कोणताही परिणाम होत नाही, असं राज्यातील अनेक स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. तरीदेखील काही राष्ट्रीय वाहिन्या, संस्था आणि व्यक्तींकडून सोशल मीडियावर ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचे 'अंनिस'नं नमूद केलं आहे. नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणाऱ्या भारताच्या नागरिकांनी अंधश्रद्धेचं ग्रहण झटकून द्यावं, असे आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलं आहे.

हेही वाचा