नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार; दुचाकीवरून आलेले दोघे सीसीटीव्हीत कैद
नगरसवेक शुभम मोटघरे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीवरून जाणारे दोन संशयित कैद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Published : August 26, 2026 at 1:23 PM IST
नागपूर : महानगरपालिका प्रभाग क्रमांक 26 मधील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घराच्या दिशेनं मंगळवारी (25 ऑगस्ट) रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी घराच्या दिशेने गोळी झाडल्याचा दावा मोटघरे यांनी केला आहे. घटनेनंतर मोटघरे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय दहशतीत असून, हल्लेखोरांना 24 तासांच्या आत अटक करावी आणि पोलिस सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शुभम मोटघरे हे प्रभागातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून रात्री उशिरा घरी परतले होते. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान ते घराच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत जोडे काढत असताना समोरच्या रस्त्यावरून दुचाकीवरून दोन व्यक्ती जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याचवेळी दुचाकीवरील व्यक्तींनी घराच्या दिशेनं बंदूक रोखून गोळीबार केल्याचा मोटघरे यांचा दावा आहे.
घटनास्थळी पोलिसांचा तपास : गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर भांडेवाडी परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळावरून गोळीची एक पुंगळी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे गोळीबारासाठी बंदुकीचा वापर झाल्याच्या दाव्याच्या तपासाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
सीसीटीव्हीत दोन संशयित कैद : शुभम मोटघरे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीवरून जाणारे दोन संशयित कैद झाल्याचं सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, हल्लेखोरांचा उद्देश काय होता आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
शुभम मोटघरे यांची सुरक्षेची मागणी : गोळीबार झाला त्यावेळी शुभम मोटघरे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब घरात होतं. त्यामुळे घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घराला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला असल्यास ही गंभीर बाब असून, पोलिसांनी तातडीनं आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी मोटघरेंनी केली आहे.
“माझे कुटुंबीय दहशतीत आहेत. माझ्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक करावी. तसेच मला पोलीस सुरक्षा द्यावी,” अशी मागणी शुभम मोटघरे यांनी केली आहे.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास : पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरून मिळालेली पुंगळी आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. गोळीबारामागील नेमकं कारण आणि हल्लेखोरांची ओळख तपासातून स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा

