ETV Bharat / state

संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राबोडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राबोडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राबोडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 15, 2025 at 7:58 PM IST

|

Updated : October 15, 2025 at 10:32 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे - अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.


आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात बोलताना, "दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा", असं वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. मात्र, अजित पवार यांनी अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.

पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान (ETV Bharat Reporter)

राबोडीतील मुख्य नाक्यावरून या मोर्चाला सुरूवात झाली. संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, धार्मिक विद्वेष पसरविणे बंद करा, हिंदू-मुस्लीम, शिख- इसाई; हम सब है भाई-भाई, अशा संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो हिंदू, मुस्लीम तरूण-तरूणी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन संग्राम जगताप यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 196, 353(2), 299 नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीचे निवेदन दिले.


याप्रसंगी मनोज प्रधान यांनी संग्राम जगताप यांचे विधान फक्त धार्मिक द्वेष पसरविणारे नाही तर अजित पवार यांनाच आव्हान देणारे आहे. एरवी शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर बोलणार्‍या अजित पवार यांचाच एक आमदार सामाजिक संघर्ष निर्माण करीत आहे. याचाच अर्थ जगताप यांना अजित पवार यांची विचारधारा मान्य नाही. तसंच, अजित पवार हे कारवाई करण्याऐवजी फक्त नोटीस देत असतील तर त्यांची जगतापांना मूक संमती नाही ना, अशी शंका मनात येते. या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की, संग्राम जगताप यांच्यासारखी माणसे जर मोकळी राहिली तर महाराष्ट्रात दंगली माजतील. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Last Updated : October 15, 2025 at 10:32 PM IST