ETV Bharat / state

राज्यभरातील शाळांसाठी FDA कडून विशेष कार्यशाळेचं आयोजन, शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएच्या कारवाईचा राज्यभर धडका सुरू आहे.

FDA
अन्न व औषध प्रशासन विभाग (File Photo - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 11:33 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएच्या कारवाईचा राज्यभर धडका सुरू आहे. मात्र, त्याचसोबत त्यांच्याकडून जनजागृती आणि संबंधितांना मार्गदर्शनही तितकंच केलं जातंय. शाळकरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची नियमावली जाहीर केल्यानंतर मुलांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये, आणि शिक्षक तसेच शाळा प्रशासनांना नव्या नियमावलीची योग्य माहिती व्हावी याकरता एफडीएच्या वतीनं राज्यस्तरीय कार्यशाळांची एक व्यापक मोहीम राबवण्यात आली, ज्याला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय.

महाराष्ट्रातील शाळांकरता विशेष कार्यशाळेचं आयोजन - 28 जुलै चे 21 ऑगस्ट दरम्यान राज्यभरातील शाळांना त्यांच्याकरता आखून दिलेल्या नियमावलीची माहिती व्हावी याकरता राज्यभरात 98 कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात 22 हजार 443 शाळांनी सहभाग घेतला होता, ज्यात 25 हजार 108 शिक्षक सहभागी झाले होते. याशिवाय 250 शाळांची तपासणी या कालावधीत करण्यात आली, तेव्हा त्यातील 11 आस्थापनांचे परवाने निलंबत तर 4 ठिकाणी परवानो रद्द करण्यात आलेत. तर अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या 2 ठिकाणचे व्यवसाय थेट बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.

मुंबईसह राज्यभरातील प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध आस्थापनं FDA च्या कचाट्यात - गेल्या आठवड्याभरात एफडीएच्या पथकाकडून राज्यभरातील एकूण 45 हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाबा यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 33 आस्थापनांना सुधारणा नोटीस देत 11 आस्थापनांचे परवाने निलंबन करण्यात आलेत. ज्या वांद्रे कुर्ला संकुलातील प्रतिष्ठित मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील आस्थापनांसह दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आयकॉनिक कॅफे कॅडेलाचाही खाद्य परवाना निलंबित करण्यात आलाय.

बीकेसीतील MCA क्लबवर FDA ची धाड - बीकेसीतील प्रतिष्ठित अशा मुंबई क्रिकेट असोसिएशनवर 20 ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. तिथल्या परमिट रूममध्ये FDA अधिकाऱ्यांनी तपासणी केली, तेव्हा या तपासणीत किचनमधील एका फ्रीजमध्ये बर्फ साचलेला आढळून आला. तसेच किचनच्या प्रवेशद्वाराजवळील फरशी अस्वच्छ आढळून आली. तसेच FSSAI परवाना हा प्रमुख ठिकाणी दर्शनी भागात प्रदर्शित केलेला नव्हता. यासह खाद्यतेलाचा रंग, वास आणि इतर घटकांच्या आधारे करण्यात येणारी नियमित तपासणी तिथं केली जात नसल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं.

भाजीपाला आणि ठेवलेला अन्य कृषीजन्य कच्चा माल खराब अवस्थेत आढळून आला. याशिवाय तिथले कर्मचारी स्वच्छता आणि सॅनिटेशन व्यवस्थेचे पालन अपेक्षित निकषांनुसार करत नसल्याचं या पाहणीत निदर्शनास आलं. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं नियमांनुसार त्यांचा परवाना निलंबित केलाय.

दादरच्या प्रसिद्ध कॅफेचा परवाना निलंबित - दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील कॅफेची अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तेव्हा तिथल्या किचनमध्ये अस्वच्छता, बुळबुळीत झालेले दरवाजे, किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची वानवा, कर्मचाऱ्यांच्या हात धुण्याच्या जागेची असुविधा, स्वच्छतागृहे आणि इतर अपुऱ्या सुविधा आढळून आल्या. इथं शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थही योग्यप्रकारे वेगळे ठेवले जात नव्हते. या सर्व गोष्टी तपासणीत निदर्शनास आल्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या प्रसिद्ध कॅफेचा परवानाही निलंबित करण्याची कारवाई केली.

पूर्व उपनगरातील काही आस्थापनांवर करवाई - कुर्ला येथील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, मुलुंड परिसरातील एक चायना टाऊन नावाचा एक चायनीझ स्टॉल इथं एफडीएनं कारवाई केलीय. इथं अन्नसुरक्षा निकषांच्या पालनाबाबत अतिशय गंभीर त्रुटी तपासणी दरम्यान हायकोर्टाच्या निदर्शनास आल्या. या तपासणीत अन्न तयार करण्याचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी स्थितीत नसल्याचंही आढळून आलं. याशिवाय स्वयंपाक घरात पसरलेली घाण, अन्नाचे पडलेले अवशेष आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था आढळून आली. तिथल्या भिंती, छत व इतर अनेक ठिकाणी पडलेले डाग, चिकटलेलं ग्रीसही आढळून आलं. आस्थापनेतील अंतर्गत भागातील फिटिंग्सही अस्वच्छ व खराब अवस्थेत होत्या. त्यामुळे या आस्थापनांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडएकडून सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आलीय.

हेही वाचा -

  1. एफडीएचा मुंबईत 'द बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेड'ला दणका; अन्न परवाना रद्द
  2. 'आता कारवाईचा अतिरेक होऊ लागलाय', एफडीएला हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड
  3. टायगर श्रॉफ, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना एफडीएची नोटीस; विमल इलायची, पान मसाला जाहिरात करणं भोवलं