पोटच्या मुलींना चक्क बापाने ढकललं वेश्याव्यवसायात, गुन्हे शाखेच्या माध्यमातून पीडित मुलींची सुटका
नवी मुंबईत पोटच्या अल्पवयीन मुलींना चक्क बापाने वेश्याव्यवसायात ढकलल्याचं खळबळजनक वृत्त आहे. गुन्हे शाखेनं पीडित मुलींची सुटका केलीय. या प्रकरणातील नराधम बाप फरार आहे.

Published : February 24, 2026 at 7:25 PM IST
नवी मुंबई - शहरातील एका नराधम बापानं चक्क पोटच्या दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या माध्यमातून या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील नराधम बाप फरार झाला असून, दलालाला मात्र पोलिसांनी गजाआड केलं आहे.
काय आहे प्रकार - अल्पवयीन मुलींकडून नवी मुंबईतील बेलापूर येथे वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गुप्त माहिती, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापेमारी करण्यासाठी सापळा रचला. या छापेमारीत 14 आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे असं आढळून आलं. पोलिसांनी संबधित अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. या अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून चक्क मुलींचे वडील असल्याचं सखोल तपासात समोर आलं. या अल्पवयीन मुलींचा नराधम बाप मुलींना दलालाच्या माध्यमातून विविध ग्राहकांच्या स्वाधीन करत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर चालवत होता.
पोक्सो व पिटा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल - पोटच्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या बापावर आणि दलालावर पोलिसांनी पोक्सो व पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती गुन्हे शाखेच्या एसीपी प्रेरणा कट्टे यांनी दिली आहे. याप्रकरणी दलालाला अटक करण्यात आली असून नराधम बाप मात्र फरार झाला आहे. संबंधित बापाला देखील लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी नवी मुंबईत नराधम बापाविरुद्ध रोष पसरला आहे. लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.
हेही वाचा...

