ETV Bharat / state

'आम्ही गावचे लोक आहोत...'; सासवड एस.टी. आगारात चालकावर जीवघेणा हल्ला; परिसरात भीतीचं वातावरण

किरकोळ वादातून काही तरुणांनी शुक्रवारी दुपारी एस टी चालकावर लोखंडी वस्तूनं हल्ला केला. यात चालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

SASWAD ST DEPOT CRIME
सासवड एस.टी. आगारात चालकावर हल्ला (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 28, 2026 at 2:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बारामती : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांची चिंताजनक मालिका सुरूच असल्याचं सासवड इथं घडलेल्या धक्कादायक घटनेतून पुन्हा समोर आलं आहे. किरकोळ वादातून काही तरुणांनी शुक्रवारी दुपारी एसटी चालकावर लोखंडी वस्तूनं हल्ला केला. यात एसटी कर्मचारी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळं परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.

वादाचं रुपांतर हिंसक हल्ल्यात : सचिन शामराव नाळे (वय ४४, रा. फलटण) हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी ते फलटण - मुंबई मार्गावरील एस.टी. बस घेऊन सासवड स्थानकात आले होते. सुमारे दुपारी तीनच्या सुमारास बस स्थानकात प्रवेश करत असताना समोर अचानक आलेल्या कारमुळं संभाव्य अपघात टाळण्यासाठी चालकानं बस थांबवली. यानंतर झालेल्या किरकोळ वादाचं रुपांतर काही वेळातच हिंसक हल्ल्यात झालं.

एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात; दोन फरार : बस फलाटावर उभी करून चालक लॉगबुक नोंद करत असताना 22 ते 25 वयोगटातील तीन तरुणांनी चालकाजवळ येत शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली. 'आम्ही गावचे लोक आहोत' असं म्हणत त्यांनी दादागिरी करत उघड जीवघेण्या धमक्या दिल्या. त्यानंतर एका आरोपीनं चालकाला लाथ मारली, तर दुसऱ्यानं लोखंडी वस्तूनं वार केला. यामुळं चालकाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या वाहकालाही तरुणांनी मारहाण केली. उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत आरोपी रोहन मारूती जाधव याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर तेजस जगताप आणि सत्यम जगताप हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. जखमी चालकावर सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचार केले.

'आम्ही गावचे लोक' : ही घटना केवळ मारहाणीपुरती मर्यादित नसून समाजातील वाढती असहिष्णुता आणि कायद्याबद्दलच्या कमी होत चाललेल्या धाकाचं उदाहरण मानलं जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे एसटी चालक आणि वाहक दिवसेंदिवस तणावपूर्ण परिस्थितीत काम करत आहेत. रस्त्यावरील किरकोळ वाद थेट हिंसाचारात बदलत असल्यानं सार्वजनिक सेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. विशेष म्हणजे, 'आम्ही गावचे लोक' अशी ओळख सांगत दादागिरी करण्याची प्रवृत्ती ग्रामीण आणि उपनगर भागात वाढत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. कायद्याची भीती कमी होत चालल्याचं हे लक्षण असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.

कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी : एसटी आगार आणि स्थानक परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा मुद्दा पुन्हा पुढं आला आहे. सीसीटीव्ही देखरेख, पोलीस गस्त आणि कर्मचाऱ्यांसाठी संरक्षणात्मक उपाययोजना वाढवण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवायची असेल तर कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचं मत व्यक्त होत आहे.

कठोर कारवाईची मागणी : या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सासवडमधील ही घटना केवळ एका चालकावरचा हल्ला नसून सार्वजनिक सेवकांच्या सुरक्षिततेबाबत समाजानं आणि प्रशासनानं गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आल्याचा इशाराच आहे.

हेही वाचा :

  1. 'अजित दादांचा अपघात की घातपात? उत्तर मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार', अमोल मिटकरींचा निर्धार
  2. ‘डहाणू फेस्टिव्हल’मधून नगरपरिषदेची माघार, स्वयंसेवी संस्था आयोजक असल्यानं संभ्रम
  3. लांडगा आणि रानकुत्र्यांचा मैत्रीपूर्ण सहवास; मेळघाटात निसर्गाचा अनोखा चमत्कार