फळबाग कशी जोपासायची? कीटकनाशकांच्या फवारणीनं मधमाशांचा मृत्यू; डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात
मधमाशांचा कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याची गंभीर बाब राहाता तालुक्यात समोर आली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांसमोर नुकसानीचे मोठे संकट उभं ठाकलं आहे.

Published : February 26, 2026 at 2:07 PM IST
|Updated : February 26, 2026 at 6:56 PM IST
By-Ravindra Mahale
शिर्डी (अहिल्यानगर)- राहाता तालुक्यातील केलवड येथील शेतकरी शरद गमे हे गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित शेती करत आहेत. त्यातील अडीच एकर क्षेत्रावर मागील दहा वर्षांपासून डाळिंब शेती करत आहेत. मागील वर्षी गमे यांनी डाळिंब बागेवर फवारणी केलेल्या काही कीटकनाशकांमुळे बागेतील मधमाशीच्या पोळ्यांतील मधमाशा मृत झाल्या आहेत. यंदा गमे यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रालाही याबाबत कल्पना देऊन नवीन कीटकनाशक औषध आणून बागेवर फवारणी केली. मात्र, या कीटकनाशकांमुळे उरलेल्या मधमाशाही मृत होत असल्याचं दिसून येत असल्यानं शेतकरी शरद गमे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलांमुळे सध्या महाराष्ट्रात मधमाशांच्या पेट्यांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे काही शेतकरी राजस्थान आणि मध्यप्रदेश येथूनही भाड्यानं मधमाशांच्या पेट्या आणत आहेत. एका पेटीचे भाडे सुमारे अडीच हजार रुपये आहे. त्यासाठी दोन हजार रुपये डिपॉझिट द्यावं लागते. सध्या, मधमाशांची संख्या कमी होत असताना त्यातच कीटकनाशकांमुळे त्या मृत होत असल्यानं शेतकरी गमे यांनी आपल्या बागेत चांगल्या परागीकरणासाठी थेट मध्यप्रदेश येथून मधमाशांच्या दोन पेट्या आणल्या. मात्र, आधी फवारलेल्या कीटकनाशकांच्या परिणामामुळे त्या पेट्यांतील मधमाशाही मृत पडत असल्यानं गमे मोठ्या संकटात सापडले आहेत.

कीटकनाशकांचा वापर अन्नसाखळी मारक- डाळिंब बागेत परागीकरणाचे सुमारे 80 टक्क्यांहून अधिक काम मधमाशांमार्फत होते. त्यांच्या केसाळ शरीरामुळे फुलांतील परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलावर सहजपणे हस्तांतरित होतात. यामुळे सुमारे 70 टक्क्यांहून अधिक अन्नपिकांच्या उत्पादनात वाढ होऊन फळांचा दर्जाही सुधारतो. याच कारणामुळे बहुतांश डाळिंब उत्पादक शेतकरी आपल्या बागेत मधमाशांच्या पेट्या ठेवून परागीकरणास चालना देतात. मात्र, अलीकडील काळात रासायनिक खतांचा आणि जहाल कीटकनाशकांचा वाढता वापर नैसर्गिक अन्नसाखळीला मारक ठरत असल्याचं शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर येत आहे.

भविष्यात शेती करणं कठीण होईल-विदेशात बंदी असलेली काही कीटकनाशके सर्रास आपल्या देशात विकली जात असल्याचा आरोपही यावेळी गमे यांनी केला. या कीटकनाशकांमुळे मधमाशांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होत असून त्यांना स्वतःचे घरटे ओळखता येत नाही. राणी मधमाशीची उत्पादनक्षमताही घटते. अखेरीस संपूर्ण वसाहतीचा नाश होतो. फवारणीनंतर अनेक मधमाशा पेटीतून बाहेर येत नाहीत. तर काही पोळ्यांखाली मृत अवस्थेत आढळून येत आहेत, असे चित्र सध्या गमे यांच्या डाळिंब बागेत दिसून येत आहे. कीटकनाशकांमुळे मधमाशाच नष्ट झाल्यास भविष्यात शेती करणं कठीण होईल, अशी चिंता गमे यांनी व्यक्त केली आहे.

कृषी विभागाचं पुरेसं लक्ष नाही- शेतकरी कृषी सेवा केंद्रावर कीटकनाशक खरेदीसाठी गेल्यानंतर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत गमे यांनी व्यक्त केली. कोणते कीटकनाशक द्यावे, याबाबत स्पष्ट माहिती नसल्यानं त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे अद्याप कृषी विभागाचं पुरेसं लक्ष गेलं नसल्याचंही त्यांनी नमूद केले. नैसर्गिक अन्नसाखळी टिकविण्यात मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यानं सरकारनं कीटकनाशकांबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी शरद गमे यांनी केली आहे.

तपासणीनंतरच कारण स्पष्ट होईल-राहाता तालुक्यातील केलवड येथे शेतकरी शरद गमे यांच्या डाळिंब बागेत मधमाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. मागील वर्षीदेखील गमे यांच्या बागेत अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बागेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. यंदाही मधमाशांचा मृत्यू होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी अधिकारी तपासासाठी सज्ज झाले आहेत. शरद गमे यांनी बागेत नेमके कोणते कीटकनाशक फवारले, किती प्रमाणात वापरले आणि कोणत्या अवस्थेत फवारणी केली. याची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. तपासणीनंतरच मधमाशांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असे राहाता तालुक्याचे कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी सांगितलं.

योग्य कीटकनाशकांची निवड करावी-राहाता तालुक्यातील इतर कोणत्याही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून अशा प्रकारची तक्रार आलेली नसल्याचंही भोरे यांनी स्पष्ट केले. राहाता तालुका डाळिंब उत्पादनासाठी ओळखला जात असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी डाळिंब शेती करतात. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. डाळिंब बागांवर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्याचा परिणाम परागीकरण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांवर होऊ शकतो. परिणामी उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे फवारणी करताना बागेत मधमाशांची वर्दळ नसताना औषध फवारावे. तसेच मधमाशांना कमी त्रासदायक कीटकनाशकांची निवड करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
महाविस्तार मोबाईल अॅपवर माहिती मिळेल- शेतकऱ्यांनी कोणते कीटकनाशक, किती प्रमाणात आणि कोणत्या अवस्थेत वापरावे यासाठी शासनाच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. कृषी विभागामार्फत योग्य मार्गदर्शन केले जाते. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ‘महा विस्तार’ या मोबाईल अॅपद्वारेही कीटकनाशकांच्या वापराबाबत सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन सहज मिळू शकते, अशी माहिती कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी दिली.
हेही वाचा-

