ETV Bharat / state

बच्चू कडू यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू नागपुरात आंदोलन करत आहेत. पण सरकार त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut
संजय राऊत (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 29, 2025 at 3:39 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात आंदोलन सुरू असताना ते गप्प का आहेत? बोलत का नाहीत? असा सवाल शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसंच, बच्चू कडू यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपदेखील राऊतांनी केला आहे.

'सातबारा कोरा करण्याची मागणी उद्धव ठाकरेंची' : आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, बच्चू कडू हे यापूर्वी सरकारमध्येच होते. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात गळे घालून फिरत होते. 'शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करा, अन्यथा चालते व्हा' ही मूळ मागणी उद्धव ठाकरे यांची आहे. बच्चू कडू यांच्यासोबत जे सहकारी या आंदोलनात सहभागी झालेत, हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्याबरोबर चालतायत, त्यांना अर्बन नक्षल ठरवणं कितपत योग्य आहे? असा सवालही खासदार राऊत यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला.

सरकारमधील भ्रष्टाचाऱ्यांना नक्षलवादी का ठरवत नाही? : शेतकऱ्यांनी आंदोलनं केलं की, त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवायचं आणि यात माओवादी घुसलेत असं घोषित करायचं. मग तुमच्या सरकारमध्ये जे भ्रष्टाचारी बसले आहेत, त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही? असा खोचक सवालदेखील केला.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार : सिहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना सरकारनं रस्त्यावर आणलेलं आहे. खरं तर या रस्त्याची काहीही गरज नाही. मात्र नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामासाठी 16 गावातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी गेल्यामुळं शेतकरी सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. रस्त्याच्या नावाखाली हजारो शेतकरी बेघर झाले आहेत. हे काम गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस करताहेत, असा गंभीर आरोपही खासदार राऊतांनी केला.

राज्यात कमालीची अस्थिरता : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मुंबईत आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन केलं. शेतकरी आंदोलन करताहेत. राज्यात विविध विषयांवरुन आंदोलनं सुरू आहेत. राज्यात कमालीची अस्थिरता आणि अशांतता आहे. अशा स्थितीत मग आंदोलन केलं की अनाकोंडा महाराष्ट्रात येणार आणि आंदोलकांना अर्बन नक्षली ठरवणार, असा टोलादेखील राऊतांनी अमित शाहांचं नाव न घेता लगावला. माझ्या माहितीप्रमाणे बच्चू कडूंचे हे आंदोलन राजकीय आंदोलन नाहीे. शेतकरी आपल्या हक्कासाठी मागणी करताहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. शेतकरी हवालदिल आहे. हे सगळे शरद जोशींचे समर्थक आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं एकून घ्या, असं आवाहनही यावेळी राऊतांनी केलं.

बावनकुळेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार : आंदोलन करणाऱ्यांकडे चंद्रशेखर बावनकुळे जाणार आहेत. यावर प्रश्न विचारला असात, राऊत म्हणाले की, "मी बावनकुळेंचे भ्रष्टाचार आणि घोटाळे पुढील दोन दिवसात बाहेर काढणार आहे. त्यांची संपत्ती विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल".

शिंदे हे अ‍ॅनाकोंडाचे पिल्लू : भाजपानं राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी 30 हजार कोटी रुपये खर्च केले. राहुल गांधी हा लोकनेता आहे. मोदी हे लोकनेते नाहीत. तुम्ही भ्रष्टाचारातून निर्माण झालेले नेते आहात. तुम्ही राहुल गांधी, आदित्य ठाकरेंना घाबरताय. कारण आदित्य ठाकरेंनी जी कट्यार काढलेली आहे, ती तुमच्या काळजात घुसली आहे. म्हणून तुम्ही आदित्य ठाकरेंना घाबरताय. लोकशाहीत विरोधी नेत्यांना पप्पू म्हणणं म्हणजे हा लोकशाहीचा अपमान आहे, असंही राऊतांनी सांगितलं.

भाजपा हा सर्वांत मोठा अ‍ॅनाकोंडा आहे. त्यांना मुंबई आणि मराठी माणूस गिळायचा आहे. अ‍ॅनाकोंडा 40 आमदार, निवडणुका, भूखंड गिळतो. अ‍ॅनाकोंडाला आता मुंबई आणि मराठी माणसाचं अस्तित्व गिळायचं आहे, अशी टीका राऊतांनी अमित शाहांचं नाव न घेता केली. अ‍ॅनाकोंडावरुन एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. याबाबत राऊतांना विचारलं असता, "एकनाथ शिंदे कोण आहेत? मी त्यांना ओळखत नाही. एकनाथ शिंदे हे अ‍ॅनाकोंडाचं पिल्लू आहेत, अशा शब्दांत राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला.

गडकरींना आमंत्रण नव्हतं का? : बेलापूर-ऐरोली मतदारसंघात 40 हजार बोगस मतदान झालं. हा घोटाळा आमदार मंदा म्हात्रे यांनी बाहेर काढला हे खरं आहे. विशेष म्हणजे, त्या सत्ताधारी पक्षातील आमदार आहेत. आम्ही तर घोटाळा बाहेर काढतोच आहे. पण नितीन गडकरींना हरवण्यासाठी साडेतीन लाख मतदार डिलीट करण्यात आले. आता नागपूरमधील मतदान कोण डिलीट करणार? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील भाजपाच्या मुख्यालय भूमीपूजन कार्यक्रमात गडकरी दिसले नाहीत. तुम्हाला दिसले का? अगदी व्यासपीठावर मुरलीधर मोहोळांपासून नारायण राणेंपर्यंत सगळे सावजी उपस्थित होते. पण गडकरींना आमंत्रण होतं का? हा संशोधनाचा विषय आहे. ज्यांनी पक्ष वाढवला, सत्ता आणली ते गडकरी कुठे होते? स्टेजवर सगळे सावजी चिकन होते. भाजपा हा बाहेरुन आलेल्यांचा पक्ष आहे. जसं बांगलादेशी देशात घुसखोरी करताहेत, तसाच भाजपा हा घुसखोरांचा पक्ष आहे, अशी जहरी टीका राऊतांनी भाजपावर केली.

हेही वाचा