विदर्भातील पांढऱ्या सोन्याला तपकिरी अन् हिरव्या रंगाची झळाळी; नागपूरच्या कापूस अनुसंधान केंद्रात यशस्वी प्रयोग
नागपूरमधील कापूस अनुसंधान केंद्रात विविध रंगाच्या कापसाचं उत्पादन घेण्याबाबत यशस्वी प्रयोग करण्यात आलाय. याबाबत 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट...

Published : February 21, 2026 at 12:36 PM IST
|Updated : February 21, 2026 at 1:34 PM IST
- धनंजय टिपले
नागपूर : कापसाचा रंग कोणता? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर एकच असेल ते म्हणजे पांढरा. कापसाला विदर्भातील पांढरं सोनं म्हणून ओळख मिळाली आहे. मात्र, भविष्यात पांढऱ्या रंगाच्या कापसाच्या जोडीला तपकिरी आणि हिरवा रंगाच्या कापसाचं उत्पादन विदर्भातील शेतकरी घेऊ शकणार आहेत. अशक्य वाटणारा हा प्रयोग नागपूर येथील कापूस अनुसंधान केंद्रात अनेक वर्षांच्या निरंतर आणि अथक प्रयत्नांनंतर यशस्वी झाला आहे.
तपकिरी रंगाच्या कापसात आढळले दोन प्रकार : "तपकिरी रंगाच्या कापसात दोन प्रकार आढळले आहेत. पहिला म्हणजे, फिकट (लाईट) तपकिरी आणि दुसरा म्हणजे गडद (डार्क) तपकिरी रंगाचा कापूस. हिरव्या रंगाच्या कापसाचा रंग स्थिर नसल्यामुळं त्यावर अद्याप संशोधन सुरू आहे. कापसाचे बोंड ज्यावेळी फुटते तेव्हा सूर्य प्रकाशाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर हिरवा कापसाचा रंग फिकट होतो. तर तपकिरी कापूस आणखी गडद होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. तपकिरी आणि हिरव्या कापसाच्या व्यतिरिक्त इतरही रंगाचा कापूस उत्पादनाचा प्रयत्न केला जाणार आहे," अशी माहिती डॉ. विजय वाघमारे यांनी दिली.
विविध रंगांसाठी कापसावर होणार प्रयोग : "रंगीत कापूस प्रजातीमध्ये उपलब्ध आहे. कापसाच्या विविध प्रजातींचं वाण (जम्प प्लाझम) नागपूरच्या (भाकृअनुप) केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्रामध्ये साठवले आहेत. अमेरिकेत कापसाची अधिक प्रमाणात लागवड केली जाते. विविधता असलेल्या 40 पेक्षा जास्त कापसाच्या प्रजातीच्या वाणांची साठवणूक केली आहे. त्यामुळं भविष्यात अनेक रंगाच्या कापसाचा प्रयोग होऊ शकतो," असं डॉ. विजय वाघमारे यांनी सांगितलं.

तपकिरी रंगाच्या कापसाचं वैशिष्ट्य : "तपकिरी रंगाच्या कापसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो कापूस जंगली प्रजातींचा उपयोग करून तयार केला आहे. त्याचं 'वैदेही वन' नामक वाण आहे. 25 वर्षानंतर हे वाण विकसित झालं आहे. सुरुवातीला कापसाचं बोंड उघडतं किंवा फुटतं तेव्हा त्याचा रंग अगदी फिकट असतो. त्याच्यावर जितका जास्त सूर्यप्रकाश पडेल तेवढा त्याचा तपकिरी रंग गडद होतो. तपकिरी रंगाच्या कापसावर अनेक वेळा प्रयोग करून झाले आहेत. वारंवार धुतल्यानंतर सुद्धा याचा रंग फिका पडत नाही. याच्या उलट हिरवा रंगाच्या कापसाचा बोंड ज्यावेळी फुटतो त्यावेळी कापसाचा रंग गडद असतो. मात्र, सूर्यप्रकाशात तो फिका पडतो," असं निरीक्षण डॉ. विजय वाघमारे यांनी नोंदवलं.

हिरव्या रंगाच्या कापसाचं वैशिष्ट्य : "नागपूरच्या कापूस अनुसंधान केंद्रामध्ये हिरव्या रंगाचा कापूस विकसित केला जातोय. त्यावर संशोधन सुरू आहे. कापसाचा हिरवा रंग फिकट आहे. कापसाचा हिरवा रंग स्थिर नाही. कापसाचे बोंड फुटल्यानंतर हिरवा रंग खुलून दिसतो. हळूहळू कापसाचा रंग फिकट पडतो. जितका सूर्यप्रकाश बोंडावर पडेल तेवढा कापसाचा रंग हा फिकट होत जातो. आमचा प्रयत्न आहे की, हिरवा रंग स्थिर राहिला पाहिजे. याचाच भाग म्हणून याचं वाण विकसित करण्याचं काम सुरू आहे," अशी माहिती डॉ. वाघमारे यांनी दिली.
रंगीत कापसाचं वाण : आतापर्यंत विकसित झालेले कापसाचे सर्व वाण सरळ आहेत. सरळ वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते हायब्रीड वाणाप्रमाणं दरवर्षी नवीन घेण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी सरळ वाण (बियाणं) एकदा शेतात लावल्यानंतर गुणाकार पद्धतीनं ते अनेक वर्षे वापरू शकतात. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी रंगीत कापसाची लागवड केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ते वाण देता येणार आहे.

रंगीत कापसाच्या उत्पादनात सूर्यप्रकाशाची महत्त्वाची भूमिका : रंगीत कापसात रंग विकसित करण्यासाठी सूर्यप्रकाशाची भूमिका महत्त्वाची आहे. सूर्यप्रकाश अधिक असल्यास रंगीत कापसाच्या रंगावर परिणाम होतो. तपकिरी रंगाचा कापूस हा योग्य सूर्यप्रकाशात अधिक गडद होतो. मात्र, सूर्यप्रकाशाची तीव्रता अधिक असल्यास तपकिरी व हिरव्या रंगाचा कापूस फिका पडतो. त्यामुळं कापसाचा योग्यवेळी वेचा (तोडणे) होणं फार गरजेचं आहे.

पांढऱ्या कापसाची मजबुती अधिक : भारतातील शेतकरी पारंपरिक पद्धतीनं कापसाचं उत्पादन घेतात. तपकिरी किंवा हिरवा रंगाचा कापूस हा पांढऱ्या रंगाच्या कापसाच्या तुलनेत तितका मजबूत नाही. जेव्हा कापसापासून धागा विणला जातो, त्यावेळी हिरवा आणि तपकिरी रंगाचा कापूस वारंवार तुटतो. या उलट पांढऱ्या रंगाच्या कापसाचा धागा तुटत नाही.

रंगीत कापसाच्या संशोधनाची गरज का पडली? : "रंगीत कापसाच्या संशोधनाची गरज का पडली असेल? जर याचा विचार केला तर काही ठळक कारणं समोर आली आहेत. पहिलं प्रमुख कारण म्हणजे, पांढऱ्या कापसापासून कापड तयार झाल्यानंतर त्याला रासायनिक (केमिकल) रंग द्यावा लागतो. केमिकल रंगांमुळं पाणी आणि मातीचं प्रदूषण होतं. कापडाला रंग देण्याची प्रक्रिया (dyeing process) फार खर्चिक असते. नैसर्गिक रंगाचा कापूस वापरल्यास प्रक्रिया कमी होते. त्यामुळं उद्योगाचा खर्च कमी होतो. नैसर्गिक रंगाच्या कापसापासून तयार झालेलं कापड त्वचेसाठी सुद्धा सुरक्षित आहे," अशी माहिती डॉ. विजय वाघमारे यांनी दिली.

रंगीत कापूस शेतकऱ्यांना किती फायद्याचा? : "भारतातील कापूस उत्पादक शेतकरी हे पांढऱ्या रंगाच्या कापसाचे उत्पादन घेतात. तपकिरी किंवा हिरवा रंगाच्या कापसाची लागवड केली तर, त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होऊ शकतो. सरकारनं या बाबतीत धोरण निश्चित करण्याची गरज असून रंगीत कापसाच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी पांढऱ्या कापसाच्या तुलनेत रंगीत कापसाला अधिक भाव देण्याची गरज आहे," असं डॉ. वाघमारे यांनी सांगितलं.

पर्यावरणाचा फायदा की तोटा : "कापसापासून सूत तयार केलं जातं आणि त्या धाग्यापासून कापड तयार केलं जातं. मुळात कापड पांढऱ्या रंगाचं असतं. त्यानंतर कापडाला रंग दिला जातो. त्या प्रक्रियेला डाय करणं असं म्हणतात. कापडाला डाय करण्यासाठी हजारो लिटर पाण्याचा वापर केला जातो. मात्र, त्यानंतर ते पाणी फेकून दिलं जातं. याशिवाय कापड डाय करण्यासाठी केमिकलचा उपयोग केला जातो. ते केमिकल सुद्धा नदी, नाले आणि समुद्रात सोडलं जातं त्यामुळं पर्यावरणाचं फार नुकसान होतं. रंगीत कापसाचा उपयोग करून कापड तयार केल्यास वरील सर्व दुष्परिणाम टाळणं शक्य आहे," असं मत डॉ. विजय वाघमारे यांनी मांडलं.

टेक्सटाईल इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलेल : "आपल्या देशामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्रीचा मोठा व्याप आहे. कच्चा माल (कापूस) विकत घेण्यापासून ते धागा तयार करणं आणि त्यापासून कापड तयार करणं. त्यानंतर कापडाला रंग देण्यापासून ते वेगवेगळ्या फॅशनच्या अनुषंगानं कपडे शिवणे आणि तेच कपडे बाजारात विकण्यापर्यंत वस्त्रोद्योगाचा विस्तार आहे. कापसापासून धागा आणि कापड विणण्यापर्यंतची ही प्रक्रिया पहिल्या टप्प्यात पूर्ण होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात त्या कापडाला विविध रंगाच्या डायमध्ये रंगवलं जातं. या प्रक्रियेत कापड विविध रंगाच्या केमिकलमध्ये रंगवलं जातं. ही प्रक्रिया फारच खर्चिक आहे. यासह या प्रक्रियेसाठी बराच वेळ जातो. भविष्यात टेक्सटाईल इंडस्ट्रीकडून रंगीत कापसाच्या उत्पन्नात प्राधान्य दिल्यास भारतीय टेक्सटाईल इंडस्ट्रीचा कायापालट होईल आणि ग्राहकांना कापड कमी किंमतीत मिळेल," असं मत कापूस अनुसंधान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं.

शरीरासाठी फायदेशीर : पांढऱ्या कापडाला विविध रासायनिक रंग देऊन रंगीत कापड तयार केलं जातं. मात्र, अनेकांना रासायनिक रंगाची अॅलर्जी असते. रंगीत कापड अनेकदा त्वचा कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते. हे सर्व आजार टाळण्यासाठी नैसर्गिक रंगाचे कपडे तयार करून ते परिधान करणं शरीरासाठी फार फायद्याचं ठरू शकतं.
..तर अनेक रंगाचा कापूस पिकवला जाईल : "जर कोणत्याही रंगातील कापसाचे विविध प्रकार विकसित करायचं असल्यास तो गुण कापसाच्या जम्प प्लाझममध्ये असणं आवश्यक आहे. दुसरा पर्याय म्हणजे, म्युटेशन करणं हा आहे. त्यात जर तो घटक मिळाला तर विविध रंगाच्या कापसाचं उत्पादन घेणं शक्य आहे," असं स्पष्ट मत केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थानचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी व्यक्त केलं.
रंगीत कापूस वरदान ठरेल : आमच्या पिढ्या न पिढ्या पांढऱ्या कापसाची शेती पारंपरिक पद्धतीनं करत आहेत. त्यात तोटा अधिक आणि नफा कमी अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी रंगीत कापूस वरदान ठरेल. परंतु, त्याआधी रंगीत कापूस पिकवायचा असेल तर त्याला बाजार भाव मिळेल की नाही? हे देखील तपासणं गरजेचं आहे. याशिवाय उन्नत शेतीचं तंत्रज्ञान देखील शेतकऱ्यांपर्यत पोहचवणे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नितेश पडोळे यांनी दिली.
रंगीत कापूस गेम चेंजर ठरू शकतो : "शेती तोट्याची ठरत असल्यानं शेतकरी शेतीपासून दुरावत आहेत. नवनवीन प्रयोगातुन दुरावलेला शेतकरी पुन्हा शेतीकडं वळू शकतो. रंगीत कापूस हा देखील गेमचेंजर ठरू शकतो. सरकारनं कापसाला योग्य भाव दिला पाहिजे. रंगीत कापूस पिकवण्याची जोखीम उचलणाऱ्या शेतकऱ्यांला योग्य भाव मिळेल ही हमी मिळायला हवी. शिवाय टेक्सटाईल इंडस्ट्रीकडून योग्य प्रतिसाद मिळाला तरी देखील रंगीत कापूस उत्पादनाला चालना मिळेल," असं शेतकरी प्रशांत गोल्हर यांनी सांगितलं.
हेही वाचा :

