अंजीर शेती केली म्हणून अनेकांनी केली टीका, पण अंजीर शेतीनंच शेतकऱ्याला बनवलं लखपती
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी शेखर जाधव यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत अंजीर शेती केली आहे. या शेतीच्या माध्यमातून ते लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत.

Published : January 20, 2026 at 2:07 PM IST
अहिल्यानगर : महाराष्ट्रात अंजीर या फळाची शेती प्रामुख्यानं पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात केली जाते. मात्र कांदा, द्राक्षे आणि ऊसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक - अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या सिन्नर तालुक्यातील शाह गावातील शेतकरी शेखर जाधव यांनी या परंपरेला छेद देत अंजीर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. गेल्या दोन दशकांत सातत्य चिकाटी आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर शेखर जाधव यांनी अंजीर शेतीतून लाखोंचा नफा मिळवून दाखवला आहे.
पारंपरिक शेतीला फाटा देत केली अंजीर शेती : सिन्नर-कोपरगाव पट्ट्यात पारंपरिकपणे कांदा, ऊस आणि द्राक्षांची लागवड केली जाते. मात्र या चौकटीबाहेर जाऊन वेगळा विचार करत शेखर जाधव यांनी 2004 मध्ये बारामती येथून दिनकर जातीची अंजीराची रोपं आणून एक एकर क्षेत्रात पहिल्यांदाच लागवड केली. दोन वर्षांनंतर बागेतून उत्पादन सुरू झालं. मात्र पुढं आंतरपीक म्हणून सागाची लागवड केली. परंतु दोन्ही पिकांचं योग्य व्यवस्थापन करता आलं नाही. त्यामुळं अंजीर बागेचं नुकसान झालं. त्यामुळं अंजीर बाग काढावी लागली. यानंतर काही काळ जाधव यांनी पुन्हा पारंपरिक शेती करायला सुरुवात केली. तरीही वेगळी शेती करण्याची इच्छा मनात कायम होती. अखेर तब्बल 12 वर्षांनंतर सन 2016 मध्ये त्यांनी पुन्हा अंजीर शेती करण्याचा निर्णय घेतला. बारामतीमधून प्रत्येकी 30 रुपयांप्रमाणं 280 अंजीर रोपं आणून त्यांनी दीड एकर क्षेत्रात 15 बाय 15 फूट अंतरावर लागवड केली.
अंजीर शेती केल्यामुळं अनेकांनी केली टीका : अंजीर शेतीसाठी रासायनिक खतांचा कमी वापर करत शेणखत तसंच सेंद्रिय खतांचा वापर केला. यासह ड्रिप सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. लागवडीनंतर दोन वर्षांनी झाडांना फळधारणा सुरू झाली. मात्र फळ विक्रीचं आव्हान जाधव यांच्यासमोर उभं राहिलं. परिसरातील अनेक शेतकरी आणि नागरिक हे उंबर कोण घेणार? अशी टीका करत होते. बाजारपेठेचा कोणताही अनुभव नसतानाही जाधव यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतः दुचाकीवरून शिर्डी, राहाता, सिन्नर आणि नाशिक इथं जाऊन थेट अंजीर विक्री सुरू केली. सुरुवातीला 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दरानं अंजीराची विक्री झाली. त्यातून खर्च भागून थोडाफार नफा मिळू लागला.

अनेक अडचणींवर केली मात : अंजीर शेतीतून चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी विक्री पद्धतीमध्ये बदल केला. स्थानिक व्यापारी, फळ विक्रेते व फ्रुट स्टॉल्सशी थेट संपर्क साधत विक्री वाढवली. त्याचा परिणाम असा झाला की आज दीड एकर क्षेत्रातील अंजीर बागेतून अवघ्या तीन महिन्यांत सुमारे 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. सर्व खर्च वजा केल्यावर 5 ते 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा होत असल्याचं शेखर जाधव सांगतात. अंजीर शेतीसाठी तुलनेनं कमी खर्च येतो. लागवडीनंतर 9 ते 10 महिन्यांत फळधारणा सुरू होते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी छाटणी करून झाडांची वाढ सुधारली जाते आणि तिसऱ्या वर्षापासून नियमित व भरघोस उत्पादन मिळतं. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेता, अनेक अडचणींवर मात करत जाधव यांनी अंजीर शेतीतून आर्थिक उन्नती साधली आहे.

तरूण शेतकऱ्यांसाठी नवी दिशा : शेतकरी शेखर जाधव यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं असून त्यांनी आपल्या मुलाला कृषी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. बीएससी अॅग्रीच्या पहिल्या वर्षात शिकणारा गणेश जाधव वडिलांना खत व्यवस्थापन, औषध फवारणी आणि फळांची निगा राखण्याबाबत मार्गदर्शन करतो. त्यामुळं उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ झाल्याचं जाधव सांगतात. पक्ष्यांपासून फळाचं संरक्षणासाठी बर्ड नेटचा वापरही जाधव यांनी अंजीर शेतीसाठी केला आहे. कधीकाळी उंबर म्हणून हसले गेलेले अंजीर आज शेखर जाधव यांना लखपती बनवत आहे. त्यांची ही यशोगाथा परिसरातील तरुण शेतकऱ्यांसाठी नवी दिशा देणारी ठरत आहे.

हेही वाचा :

