अजबच! बैलजोडी खरेदी करून घरी निघालेल्या शेतकऱ्यावर लातुरात गुन्हा दाखल
बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यावर लातूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. कत्तलीसाठी बैलजोडी घेऊन जात असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यावर करण्यात आला आहे.

Published : May 26, 2026 at 1:31 PM IST
|Updated : May 26, 2026 at 1:39 PM IST
लातूर : शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे पायी निघालेल्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (25 मे) समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात असून, 'कागदपत्रं असतानाही शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे का?' असा सवाल उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्यानं शेतीच्या कामासाठी बैलजोडी खरेदी केली होती. खरेदीची आवश्यक कागदपत्रे त्याच्याकडे असतानाही पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेमका प्रकार काय : अधिक माहिती अशी की, लातूरच्या अरजखेडा येथील शेतकरी भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी धाराशिवच्या पाटोदा येथील बाजारातून शेतीच्या कामासाठी बैलजोडी खरेदी केली होती. खरेदीनंतर दोघंही बैल घेऊन पायी आपल्या गावाकडे निघालं होते. त्यांच्या जवळ ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेले अधिकृत जनावर खरेदी-विक्रीचे दाखलेही होते.
दरम्यान, खोपेगाव परिसरात काही बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवून बैल कुठे आणि कशासाठी नेत आहात? अशी विचारणा करत बराच वेळ रोखून धरल्याचा आरोप शेतकरी पिता-पुत्राकडून करण्यात आला आहे. शेतकऱ्यानं सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना जाऊ देण्यात आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
यानंतर लातूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात पुन्हा त्यांना अडवण्यात आलं. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचं लक्षात आल्यानंतर महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधला. त्यानंतर विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यावरच कारवाई : मात्र, कारवाई अडवणाऱ्यांवर न होता बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधित जनावरं गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं. या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाचं वातावरण निर्माण झाले असून, 'शेतीसाठी बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवले जात असेल, तर सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं?' असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी, 'शेतकऱ्यांवर गोरक्षकांकडून होणारा त्रास सहन केला जाणार नाही. या अन्यायाविरोधात आवाज उठवला जाईल,' असा इशारा दिला आहे.
पोलिसांनी काय सांगितल? : कत्तलीच्या उद्देशानं बैलजोडी घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला विवेकानंद चौक पोलिसांनी बैलजोडीसह ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमवारी (25 मे) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव श्यामराव सूर्यवंशी (वय 55, रा. आरजखेडा, ता. रेणापूर) हे कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता बैलांना क्रूरपणे पायी चालवत घेऊन जात होते. औसा रोडवरील छत्रपती चौक परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्यानं ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक प्रताप वांगे यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत कलम 5 ए (1) आणि 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंमलदार पी. जी. सिरमवाड करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

