ETV Bharat / state

कौटुंबिक वादाचे हिंसक रूप; मुलगा अन् सुनेला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, अमरावतीच्या तिवसातील घटना

अमरावती येथील तिवसामध्ये कौटुंबिक वादातून एका बापानं मुलगा अन् सुनेला कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Family Dispute Turns Violent in Amravati
मुलगा अन् सुनेला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 23, 2026 at 10:56 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : जिल्ह्यातील तिवसा शहरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जन्मदात्या पित्यानं आपल्याच मुलाला आणि सुनेला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत सून गंभीर जखमी झाली असून दोन्ही बाजूंनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेत तिवसा येथील रहिवासी सून अश्विनी आजाद खान (वय 37) गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी त्यांचे सासरे मोहम्मद जमा इद्रिस खान (वय 65) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी अश्विनी खान यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

कौटुंबिक कारणांवरून अनेक दिवसांपासून वाद : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जून रोजी दुपारी तिवसा न्यायालयाजवळील एका हॉटेलसमोर ही घटना घडली. संबंधित कुटुंबामध्ये कौटुंबिक कारणांवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच पार्श्वभूमीवर हॉटेल परिसरात दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर परिस्थिती चिघळून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तिवसा पोलीस करत आहेत.

अंगावर वाहन घालून चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप : अश्विनी खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद जमा इद्रिस खान यांनी चारचाकी वाहन भरधाव वेगानं चालवत मुलगा आणि सुनेवर चढवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत वाहनाची धडक बसल्यानं अश्विनी खान गंभीर जखमी झाल्या, तर त्यांचे पती थोडक्यात बचावले. या प्रकारात हॉटेलच्या मालमत्तेचंही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

मारहाणीचाही आरोप : घटनेदरम्यान, इतर नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. यावेळी मारहाणीचा प्रकार घडल्याचाही आरोप जखमी महिलेनं केला आहे. काही व्यक्तींनी आपल्याला आणि आपल्या पतीला मारहाण केल्याचा दावा अश्विनी खान यांनी तक्रारीत केला आहे.

दुसऱ्या बाजूकडूनही तक्रार दाखल : दरम्यान, या प्रकरणात दुसऱ्या बाजूकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहम्मद जमा इद्रिस खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलानं त्यांना भेटण्यासाठी बाहेर बोलावलं आणि त्यानंतर त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे. पुढे झालेल्या झटापटीत आपणही जखमी झाल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.

परस्परविरोधी गुन्हे दाखल : या घटनेनंतर तिवसा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची दखल घेत परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब, तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात आजाद खान, त्यांचे वडील मोहम्मद इद्रिस खान आणि आई मोबीना मोहम्मद खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती तिवसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ उपाध्ये यांनी दिली.