ETV Bharat / state

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

परवाना पडताळणी मोहीम 1 मेपासून सुरू होणार असून, मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द केले जातील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केलंय.

Extension until August 15 for auto rickshaw
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 28, 2026 at 3:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- मराठी भाषा सक्तीबाबत 1 मे ते 15 ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीय. या कालावधीत केवळ मराठी भाषा न येण्याच्या कारणावरून कोणाचाही परवाना रद्द केला जाणार नाही. चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ आणि पुरेसा वेळ दिला जाणार आहे. त्याच वेळी परवाना पडताळणी मोहीम 1 मेपासून सुरू होणार असून, मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द केले जातील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केलंय.

सरनाईक यांची 59 आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक : सोमवारी वाहतूक संघटना आणि राजकीय नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 59 आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय.

30 रोहिंग्यांनी बेकायदेशीरपणे परवाने मिळवले? : मीरा भाईंदरमध्ये रिक्षा चालकांना मराठी येते की नाही याबाबत पडताळणी मोहीम सुरू आहे. काही रिक्षा चालकांनी खोटी कागदपत्रे दाखवून अवैध पद्धतीने परवाने मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार या पडताळणी मोहिमेत मराठी भाषा न येणारे आतापर्यंत 565 रिक्षाचालक आढळून आले आहेत. तसेच काही बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांनी बेकायदेशीररीत्या परवाने मिळवल्याच्या सुमारे 30 तक्रारी प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली. आजच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, तपासाअंती संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला जाणार असून, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तहसीलदार कार्यालयामार्फत सुरू असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

2019 च्या शासन निर्णयात दुरुस्ती करणार? : शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सांगितले की, या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल बैठक बोलावली होती. त्या बैठकीत महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषेचं ज्ञान असावं आणि सर्वांनी मराठीत संवाद साधावा, असा सर्वसाधारण सूर होता. मात्र, मराठी बोलता येत नसल्यास थेट परमिट किंवा लायसन्स रद्द करण्याचा निर्णय कठोर आणि चुकीचा ठरू शकतो, अशी भूमिका काहींनी मांडली. अशा निर्णयामुळे अनेक चालकांवर उपासमारीचं संकट ओढवू शकतं, अशी चिंताही बैठकीत व्यक्त करण्यात आली.

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवले जाणार : यावर मंत्री सरनाईक यांनी पूर्वीच्या शासन निर्णयात (GR) आवश्यक सुधारणा करण्याचं आश्वासन दिलंय. ज्या ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात येईल आणि ते मराठीत संवाद साधू शकतील, अशी व्यवस्था उभी केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं निरुपम म्हणालेत. 15 ऑगस्टपर्यंत विविध संघटनांकडून आपापल्या भागात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवले जाणार आहे. मराठी भाषा ही रिक्षा-टॅक्सी चालकांना अनिवार्य असणारच आहे. त्यामुळे आम्ही फक्त मुदतवाढ देत आहोत पण मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असं सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितलं.

हेही वाचा-