'रोज खा मटण अन् कमळाचं दाबा बटण' : अशोक चव्हाण यांचा मतदारांना अजब सल्ला
महापालिका निवडणूक 2026 ची मोठी रंगत वाढली. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 'रोज खा मटण अन् कमळाचं दाबा बटण' असा अजब सल्ला मतदारांना दिला.

Published : January 9, 2026 at 12:56 PM IST
|Updated : January 9, 2026 at 3:41 PM IST
नांदेड : महानगरपालिका निवडणूक 2026 च्या प्रचारात राजकीय धुरंधर आपल्या रंजक वक्तव्यानं चर्चेत येत आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी भर घातली आहे. नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीचा प्रचार करताना अशोक चव्हाण यांनी तरोडा इथं प्रचार सभेत बोलताना “रोज मटण खा, पण कमळाचं बटण दाबा” असा अजब सल्ला मतदारांना दिला. त्यांच्या या अजब आणि लक्षवेधी वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

रोज खा मटण, पण कमळाचं दाबा बटण : तरोडा इथं भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अजब वक्तव्य केलं. "आता तुमच्याकडं विरोधक येतील, ते तुम्हाला वेगवेगळी प्रलोभणं देतील. वेगवेगळ्या पार्ट्यांचं आमिष देतील. तुम्ही पार्ट्या खा, रोज मटण खा, मी तर म्हणेल की रोज खा मटण अन् भाजपाचं दाबा बटण." माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या या अजब वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत चुरस : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 20 प्रभागांमधील 81 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत सुमारे 5 लाख 1 हजार 799 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजपा, शिवसेना, उबाठा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली.
हेही वाचा :

