ETV Bharat / state

"देवेंद्र फडणवीसांची इच्छा चांगली, पण...", मुंबईच्या मुद्द्यांवर काय म्हणाले राज ठाकरे?

मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं कारस्थान दिल्लीत सुरू असल्याचा स्फोटक दावा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray and Uddhav Thackeray Saamna interview
उद्धव ठाकरे, राज ठाकरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 9, 2026 at 2:25 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार… हा मुद्दा प्रत्येक मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून (उबाठा) मांडला जातो. या भावनिक मुद्द्यावर ठाकरेंनी अनेक वर्षे निवडणूक लढवली. पण, सूर्य चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या सभेत केलं. यावर ठाकरे बंधूंनी थेट दिल्लीकडे बोट दाखवत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं कारस्थान दिल्लीत सुरू असल्याचा स्फोटक दावा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात, त्याला फारसे महत्त्व उरत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दिल्लीतील सत्ताकेंद्र वेगळाच निर्णय घेत असेल, तर राज्यातील मुख्यमंत्री काहीही करू शकत नाहीत, असा थेट हल्लाबोल त्यांनी केला.

फडणवीसांची इच्छा चांगली आहे, पण...: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंना दैनिक 'सामना'मधील मुलाखतीत प्रश्न विचारला गेला. त्यावर "देवेंद्र फडणवीसांची इच्छा चांगली आहे, पण त्यांच्या हातात काही नाही," असं राज ठाकरेंनी म्हणत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा शिवसेनेचा पारंपरिक मुद्दा कायम ठेवलाय. त्याचबरोबर मुंबईची संस्कृती मारून नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याला काय अर्थ आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. दरम्यान, 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीचा भाग-2 आज प्रसारित करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बोलत होते.

मुंबई नियोजित पद्धतीनं वेगळी करण्याचा प्रयत्न : "मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर तुमचा विश्वास आहे का?," असा प्रश्न संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना विचारला. त्यावर "मुंबई ही नियोजित पद्धतीनं वेगळी करण्याचा प्रयत्न केला जातोय," असं राज ठाकरे यांनी सांगितलं. पुढं ते म्हणाले, "संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी जे मुंबईत काही मोजके धनदांडके होते. त्या लोकांची मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची मागणी केली गेली होती. आता त्या 5 लोकांचे 50 लोक झाले आहेत. वाढवण बंदरला विमानतळ कशाला हवं? काही दिवसांनी आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानं नवी मुंबईकडे वळवायचा. आताच्या विमानतळाचा कार्गो वाढवण बंदराकडे न्यायचा आणि पुन्हा विमानतळाची जागा विकायला काढायची असं नियोजन असू शकेल,"अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.

मोदींकडून अदानींवर मेहेरबानी : याचबरोबर, उद्योजक गौतम अदानींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मेहेरबानी केल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर आज हे सगळं घडत असताना भाजपाचे लोक हवालदिल का आहेत? असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. सगळी बसवलेली माणसं असून, आता बसलेल्यांनाच दूर करण्यात येत असल्याचा घणाघात राज ठाकरेंनी केला. यावेळी, त्यांनी शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी यांची नावं घेत लक्षवेधी वक्तव्य करत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर राज ठाकरेंनी जहरी टीका केली.


अदानी आणि अंबानींमध्ये हा फरक : उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्यातील फरक सांगताना अंबानी हे मोदी पंतप्रधान होण्याआधीपासून मोठे होते. अदानी हे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर मोठे झाल्याचं म्हटलं जातं. राज ठाकरे म्हणतात , "नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मुंद्रा पोर्ट मिळाला. पंतप्रधान झाल्यानंतर असंख्य गोष्टी मिळाल्या. जर भाजपाचं सरकार नसतं आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार असतं व एकाच उद्योगपतीवर मेहेरबानी केली असती तर भाजपाला चाललं असतं का?" हा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसंच काँग्रेसच्या पंतप्रधानांवर कोणत्याही राज्याचा टॅग नव्हता. पण आताच्या पंतप्रधानांवर आहे. त्यामुळं जितकं लक्ष मुंबईकडे दिलं जातंय, ती धोक्याची घंटा असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.


मराठी विरुद्ध हिंदू प्रचार : भाजपाकडून मुंबईचा महापौर हा हिंदू असेल असा उल्लेख वारंवार केला जात आहे. तर ठाकरे बंधूंकडून मुंबईचा महापौर हा मराठी असेल, असा प्रचार केला जातोय. या निवडणुकीत भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा पुढं घेऊन जात असताना शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांनी त्यांचा पारंपरिक मराठी मतदाराला साद घातली आहे. याबाबत मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपा मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणारे मोरारजी देसाई हे हिंदू नव्हते का? त्यांनी पोलिसांकडे गोळ्यांचा हिशोब मागितला होता. त्यांचा जन्म गुजरातचा होता. याउलट दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जेव्हा नरेंद्र मोदींना बाजूला सारत होते, तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. ते एक मराठी माणूस होते. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी मराठी आणि हिंदू हा जो फरक सुरू केला आहे, तो नेमका काय आहे, ते स्पष्ट करावं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पारंपारिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवणार : दरम्यान, 2023-24 या वर्षात मुंबईत बराच बदल झाला आहे. हे राज ठाकरे सभांमधून मांडणार आहेत. त्यामुळं ठाकरे बंधूंकडून मराठी विरुद्ध गुजराती मतदार, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा मोदी शाहांचा प्रयत्न या मुद्यांवर भर दिला जाईल, असं चित्र आहे. या मुलाखतीत मुंबईला लागून असलेल्या गुजरात बॉर्डरचा विकास, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न या सगळ्यावर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर मराठी शाळा, मुंबईचं प्रदूषण, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रूपये या वचननाम्यातील बाबींवर भाष्य केलं. मुंबई वाढणाऱ्या परराज्यातील लोंढ्यामुळं मुंबईच्या चांगल्या योजना राबवण्यात अडचणी येत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच या संपूर्ण मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पारंपारिक मुद्द्यांवरच ही निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांच्या सभांमधून या मुद्द्यांवर अधिक भाष्य करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. नागपुरात भाजपाची मोठी कारवाई, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या 32 सदस्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी
  2. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा झंझावाती रोड शो: रस्त्यावर 'एकच ब्रँड ठाकरे ब्रँड'च्या घोषणा
  3. शिवसेना भाजपा वाद भोवला; नवी मुंबईतील 'या' प्रभागाच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती