बीडच्या युवकाची कमाल; झाडांच्या पानांवर करतोय भरतकाम, छत्रपती शिवरायांच्या साकारलेल्या छायाचित्राच्या भरतकामाची सर्वांना भुरळ
पुण्यात भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलंय. यात विविध स्टॉल आहेत. पण या जत्रेत भरतकाम कलेचा असलेला स्टॉल सर्वांना भुरळ घालतोय.

Published : December 27, 2025 at 2:39 PM IST
|Updated : December 27, 2025 at 4:49 PM IST
पुणे : आजपर्यंत आपण कापडावर विविध प्रकारचं केलेलं भरतकाम पाहिलं आहे. कापडावर विविध आकर्षक केलेलं डिझाईन, रंगबेरंगी फुलपाखरू तसंच विविध प्राणी, पक्षी यांच्या डिझाईन आपण पाहिल्या असतीलच. पण कधी झाडांच्या पानांवर केलेलं भरतकाम पाहिलंय का? होय, झाडाच्या पानावर केलेलं भरतकाम. हे शक्य करून दाखवलंय बीडमधील एका तरुणानं. या तरुणाचं नाव आहे अनिकेत पवार. यानं झाडांच्या पानांवर भरतकाम करून पक्षी, प्राणी, तसंच विविध आकर्षक डिझाईन साकारल्यात. महत्त्वाची बाब म्हणजे अनिकेतचं छत्रपती शिवाजी महाराजांचं झाडाच्या पानावर साकारलेलं भरतकाम पाहण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या भीमथडी जत्रेत मोठ्या संख्येनं नागरिक गर्दी करताना पाहायला मिळताहेत.

प्रत्येकाकडं प्लॅन बी असणं गरजेचं : म्हणतात ना आयुष्यात प्रत्येकाकडं प्लॅन ए आणि प्लॅन बी असला पाहिजे. पण अनेक जण प्लॅन एसाठी खूप प्रयत्न करतात. पुण्यात मोठ्या संख्येनं विद्यार्थी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. झाडांच्या पानांवर भरतकाम करणारा अनिकेत पवार हा त्यापैकी एक विद्यार्थी होता. अनिकेत पवार हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. एमपीएससी परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळण्याचं स्वप्न रंगवत अनिकेत पुण्यात आला. त्यानं चार वर्ष जिद्द आणि चिकाटीनं परीक्षेसाठी तयारी केली. परंतु यश त्याच्यापासून दूरच राहिलं. अपयश आल्यानंतर खचून न जाता अनिकेतनं प्लॅन बी निवडला. अनिकेतचा भाऊ सौरभ देवडेनं फॅशन डिझाईनचा कोर्स केलाय. त्याच्या सहाय्यानं लॉकडाऊनमध्ये अनिकेतनं वेगळा पर्याय निवडत झाडांच्या पानांवर भरतकाम करायला सुरुवात केली. यात त्याची बहीण प्राजक्ता पवार हिनं त्याला साथ दिली. हळूहळू हे दोघंही झाडांच्या पानांवर भरतकाम करू लागले. आज दोघे भाऊ आणि बहीण यांनी बीड, पैठण आणि पुण्यात हा व्यवसाय सुरू केलाय.
भरतकाम करताना करावी लागते खूप मेहनत : "आमच्या प्रॉडक्टचं नाव 'बीसस्पोक बाय सौरभ' असं आहे. भरतकाम कलेला आम्ही नवीन स्वरूप देण्याचं काम केलंय. होम डेकोर, ज्वेलरी, गिफ्टिंग यात आम्ही नवीन रूप दिलंय. आम्ही झाडांच्या पानांवर भरतकाम करतो. यात विविध पक्षी-प्राणी तसंच विविध डिझाईन आणि फोटो फ्रेमसाठी भरतकाम करतो. मी आणि माझ्या भावानं बीडमधून या व्यवसायाला सुरुवात केली होती. हळूहळू या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असून, पैठण आणि पुण्यात आम्ही आमचं काम वाढवलंय. जवळपास 30 महिला आमच्या इथं काम करतात. रबर प्लँटची पानं, फणसाच्या पानावर तसंच विविध पानांवर आकर्षक भरतकाम आम्ही करतो. भरतकाम करताना खूप मेहनत करावी लागते. तसंच अतिशय बारकाईनं हे काम करावं लागतं. आम्ही विविध पानांवर केलेल्या भरतकाम कलेला देशभर तसंच बाहेरच्या देशातून देखील मागणी येत आहे. विशेष भाग म्हणजे आम्ही आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भरतकामच्या माध्यमातून झाडाच्या पानावर साकारली असून, ती नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे," असं अनिकेत पवारनं सांगितलंय.

हेही वाचा :

