ETV Bharat / state

विजेचा धक्का लागल्यानंतर वाचविण्याचे प्रयत्न ठरले फोल; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

फलटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा वीजेच्या शॉकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

electric shock death in Satara
घटनास्थळी पोहोचलेले पोलीस (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 12:13 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा - फलटण तालुक्यातील खामगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी 6 वाजण्याचा सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली आहे. कुटुंबप्रमुखाला विजेचा धक्का लागल्यानं त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकमेकांना विजेचा धक्का लागून कुटुंबातील चौघेही मृत्युमुखी पडल्याची माहिती फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली आहे.


राहत्या घराच्या बाहेर विजेचा धक्का लागून सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय 45), त्यांची पत्नी गंगू सतीश शिंदे (वय 40), मुलगा सचिन सतीश शिंदे (वय 26) आणि मुलगी आरती सतीश शिंदे (वय 24, रा. खामगाव, ता. फलटण), अशा चौघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या चौघांना विद्युत खांबावरील घरगुती कनेक्शनच्या तारेचा की बल्ब काढताना शॉक लागला आहे. त्याचा पोलीस तपास करत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

electric shock death in Satara
घटनास्थळी पोहोचलेले पोलीस (Source- ETV Bharat Reporter)

एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघांचाही मृत्यू - यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने सतीश उर्फ पिसुरड्या शिंदे यांना शॉक लागला. ही बाब लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी पत्नी आणि मुलांनी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.



मृत्युमुखी पडलेलं शिंदे कुटुंब खामगावातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ वास्तव्यास होतं. बुधवारी सकाळी उठून घराबाहेर आलेल्या सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय 48) यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या पत्नी गंगुबाई, मुलगा सचिन मुलगी आरती यांनाही वीजेचा जबर धक्का बसला. काही क्षणात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

सखोल तपास सुरू- धक्कादायक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. घराबाहेरील विद्युत वायरमध्ये नेमका वीज प्रवाह कसा आला? यामागे महावितरणचा तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण आहे? याचा सखोल तपास केला जात असल्याचं पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा-