ETV Bharat / state

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट बनलाय, संजय राऊतांचं पुन्हा 'रोखठोक'

अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना धमकावल्याचं निवडणूक आयोगाला दिसत नसेल, तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut
शिवसेने(उबाठा)चे खासदार संजय राऊत (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 6, 2026 at 12:22 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून, बिनविरोध निवडणुकांवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना धमकावलं जात असल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाही निवडणूक आयोगाला ते दिसत नसेल, तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

अध्यक्षांच्या दहशतीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही : शिवसेना आणि मनसेचे उमेदवार बबन महाडिक हे अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे होते. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला गेला नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. ही घटना घडत असताना निवडणूक आयोगाचे डोळे बंद होते का? की त्यांच्या डोळ्यांत गारगोट्या आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. हे सर्व जर निवडणूक आयोगाला दिसत नसेल, तर आयोग सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करीत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप संजय राऊतांनी केलाय.

प्रत्येक गोष्टीचा हिशोब निवडणूक आयोगाला द्यावा लागेल : निवडणूक आयोगाचा क्लीनचिट देण्याचा कारखाना देश आणि राज्यासाठी धोकादायक असल्याची टीका त्यांनी केलीय. प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोग नियमांच्या बाहेर जाऊन काम करीत असून, कायद्याचं उल्लंघन केलं जातंय. सत्ताधारी पक्षाला मदत होईल, असे निर्णय जाणीवपूर्वक घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र या प्रत्येक गोष्टीचा हिशोब निवडणूक आयोगाला द्यावा लागेल, कारण प्रत्येक गोष्टीला अंत असतो, असा इशारा राऊत यांनी दिलाय. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकांपूर्वीच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत असल्याने विरोधकांकडून तीव्र टीका केली जातेय. संजय राऊत यांनी बिनविरोध निवडणुका सरळ मार्गाने झालेल्या नाहीत, हे निवडणूक आयोगालाही दिसत आहे, असं स्पष्ट शब्दात सुनावलंय.

राहुल नार्वेकर यांना निवडणूक आयोगाने क्लीनचिट दिली : राऊत यांनी आरोप केला की, बिनविरोध निवडणुका या धमकी, पैसे आणि यंत्रणांच्या गैरवापरातून झाल्या आहेत. राहुल नार्वेकर यांना निवडणूक आयोगाने क्लीनचिट दिली. ज्या अधिकाऱ्यावर महापालिकेने ठपका ठेवला होता, त्यालाही क्लीनचिट देण्यात आली. पैसे देऊन काही ठिकाणी लोकांनी टोकन घेतले, तर काही ठिकाणी आप, जनता दल यांसारख्या पक्षांच्या उमेदवारांनाही अर्ज भरू दिले गेले नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. या निवडणूक आयोगाच्या काळात महाराष्ट्रात तब्बल 70 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्यात. यापूर्वी कधी एवढ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या का? हे दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी दिले. महाराष्ट्रात मोठमोठे नेते होऊन गेले, मनोहर जोशींसारखे नेते होते, नगरसेवकही होते; पण कधी बिनविरोध निवडणुका झाल्या काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शेवटी त्यांनी हे छपरी-टपरी शिंदे आणि भाजपाचे गुंड लोक बिनविरोध निवडून येत आहेत आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीनचिट देत आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असून, सामान्य नागरिकांनी या सगळ्या प्रकाराकडे डोळसपणे पाहण्याची गरज असल्याची गरज संजय राऊत यांनी बोलून दाखवली.