एल निनोचा इशारा : मान्सून, शेती आणि दुष्काळावर नेमका काय परिणाम होणार?
एल निनोमुळे देशातील पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत चिंता वाढली आहे.

Published : June 13, 2026 at 6:44 PM IST
|Updated : June 13, 2026 at 8:58 PM IST
मुंबई - भारतीय हवामान विभागाने (IMD) पॅसिफिक महासागरात एल निनो परिस्थितीची अधिकृत घोषणा केली असून, यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात त्याचा प्रभाव मध्यम ते तीव्र स्वरूपाचा राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एल निनोमुळे देशातील पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत चिंता वाढली आहे. दरम्यान, पावसावर प्रभाव टाकणारा आणखी एक महत्त्वाचा हवामान घटक असलेला भारतीय महासागर द्विध्रुवीयता (IOD) मान्सून हंगामाच्या अखेरपर्यंत तटस्थ स्थितीत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
एल निनो म्हणजे काय? - एल निनो म्हणजे विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढणे. याउलट ला निनो म्हणजे याच भागातील समुद्राचे तापमान नेहमीपेक्षा कमी होणे. एल निनो आणि ला निनो या उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील नैसर्गिक हवामान प्रक्रियेचा भाग असून, त्यांचा जगभरातील हवामानावर मोठा परिणाम होतो. एल निनोमुळे अनेक देशांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता असते, तर काही भागांत अतिवृष्टीही होऊ शकते.

आपत्कालीन कृती आराखड्याचे पुनरावलोकन - एल निनोच्या संभाव्य परिणामांबाबतच्या अंदाजांमुळे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे मंत्रालयाने भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), राज्य कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागांना एल निनोच्या परिस्थितीचा विशेष विचार करून आपत्कालीन कृती आराखड्यांचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. खरीप हंगामाचा जोर वाढण्यापूर्वी हे सुधारित आराखडे 20 जूनपर्यंत मंत्रालयाकडे सादर करण्याची अपेक्षा आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) दीर्घकालीन अंदाजाच्या आधारे 150 ते 200 जिल्हे सर्वाधिक संवेदनशील म्हणून ओळखण्यात आले आहेत. मराठवाडा-उत्तर कर्नाटक पट्ट्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा सर्वाधिक धोका व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्येही पावसातील तुटीचा धोका अधिक असल्याचे मानले जात आहे. तेलंगाणातील काही भाग आणि दक्षिण भारतातील काही किनारी क्षेत्रे वगळता देशातील जवळपास सर्वच भागांवर एल निनोचा काही ना काही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात एल निनोवर काम करण्यासाठी टास्क-फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पेरणीसंदर्भात सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये. राज्य सरकारच्या कृषी सल्ल्यानुसार पेरणी केल्यास दुबार पेरणीची वेळ येणार नाही. मात्र पावसाची खात्री नसताना पारंपरिक पद्धतीने पेरणी केल्यास नुकसान होऊ शकते. एसएमएस, महाविस्तार ॲप आणि कृषी विभागाच्या सूचनांवर विश्वास ठेवूनच पेरणीचे निर्णय घ्यावेत.”
दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होणार? - 1871 ते 2022 या 152 वर्षांच्या कालावधीत आलेल्या 16 एल निनो वर्षांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील नॅशनल ओशिएनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) या संस्थेने यंदा देशात पावसात मोठी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोचा प्रभाव कायम राहणार असून, त्यामुळे मान्सूनच्या प्रमुख महिन्यांमध्ये पर्जन्यमान कमी राहू शकते, असे संस्थेचे म्हणणे आहे. दुसरीकडे, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशात यंदा सरासरीच्या 84 ते 90 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच पावसात 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. दोन्ही संस्थांच्या अंदाजांमध्ये पाऊस कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एल निनो आज सक्रिय झालेलं नाही तर गेल्या काही वर्षांपासून याचा परिणाम देशात दिसून येत असल्याचं नवी दिल्लीतील भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉ. के. जे. रमेश ईटीव्ही भारतशी बोलताना सांगतात. “एल निनोची सुरुवात समुद्राच्या तापमानात सुमारे 0.5 अंश सेल्सिअस वाढ झाल्यानंतर मानली जाते. यंदा जूनपासून पुन्हा तापमानवाढ सुरू झाली असून ऑगस्ट-ऑक्टोबरदरम्यान ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. एल निनो हा भारतीय मान्सूनवर परिणाम करणारा महत्त्वाचा हवामान घटक असला, तरी शेती आणि अन्न उत्पादन केवळ पावसावर अवलंबून नसते. हवामान बदलामुळे भारतातील पावसाचे स्वरूपही बदलत आहे. राजस्थान, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात पर्जन्यमान वाढत असताना उत्तर प्रदेश व बिहारमध्ये घट होताना दिसत आहे. त्यामुळे एल निनोसोबतच भूजल, स्थानिक हवामान आणि इतर घटकांचा दुष्काळावर होणारा परिणामही लक्षात घ्यावा लागेल.”
2015 साली एल निनोचा परिणाम प्रचंड प्रमाणात होता असं आकडेवारीतून स्पष्ट होतं.
हेही वाचा...

