ETV Bharat / state

शिंदेंच्या मंचावरून बाळासाहेबांच्या शेवटच्या भाषणाची खिल्ली? शिवसेना (उबाठा) नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया आणि पावसकरांचा बचाव

किरण पावसकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.

Kiran Pavaskar mocked Balasaheb Thackeray's speech
शिंदेंच्या मंचावरून बाळासाहेबांच्या शेवटच्या भाषणाची टिंगल? (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 23, 2026 at 12:02 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत पक्षात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली ही राजकीय घडामोड अखेर प्रत्यक्षात उतरली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांनी अधिकृतपणे शिवसेनेची वाट धरली. या प्रवेशामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाला राजकीय धक्का मानला जात आहे. हा कार्यक्रम बंडखोर खासदारांसोबतच आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिला.


पावसकरांकडून बाळासाहेबांच्या वक्तव्याची खिल्ली? : पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शिवसेना प्रवक्त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले किरण पावसकर यांनी भाषणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला. “याला सांभाळा, त्याला सांभाळा… हे काय पाळणाघर आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पावसकर यांच्या या विधानामुळे आता नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाची खिल्ली उडवण्यात आल्याची टीका ठाकरे गटाकडून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पक्षप्रवेशानंतर बोलताना या खासदारांनी मतदारसंघातील विकासकामे आणि निधीअभावी निर्माण झालेल्या अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी “एक वाघ नव्हे, तर सहा वाघ आज आमच्यासोबत आले,” असे म्हणत या घडामोडीचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये पावसकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानेच अधिक लक्ष वेधून घेतलं.



अमित शाह यांच्यावर पावसकर बोलले असते तर चाललं असतं का? : किरण पावसकर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. माजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी याबाबत बोलताना म्हटलं, “किरण पावसकर नावाचा कोण्या टवाळखोर माणसानं मा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या वक्तव्याची टिंगल केली. तेही व्यासपीठावर 'सो कॉल्ड' शिवसैनिक म्हणवणाऱ्या लोकांच्या गराड्यात! राजकारण गेलं चुलीत! हा आमच्या दैवतावर बोलतो. एकनाथ शिंदेजी, अमित शाह यांच्याबद्दल तो असा बोलला असता तर तुम्हाला चालले असते का? खाल्ल्या ताटात घाण करणाऱ्या या माणसानं माफी मागायला हवी. आराध्य दैवताच्या शब्दांची असली टिंगल खपवून घेतली जाणार नाही. वेळ पडली तर हिशेब चुकता होईल.”

'ती' शिवसेनेची भूमिका नाही - दरम्यान राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी किरण पावसकर यांच्या विधानापासून अंग काढून घेतलं आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हा सर्वांसाठी वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दल अशा पद्धतीच्या विधानाचं मी समर्थन करणार नाही. त्याबरोबरच मी हे ही सांगतो की किरण पावसकर यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. शिवसेना पक्षाशी त्याचा संबंध नाही."

किरण पावसकर यांचं स्पष्टीकरण - आपल्या विधानावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असल्याचं लक्षात येताच किरण पावसकर स्वतः स्पष्टीकरणासाठी पुढे आले. "हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्याचं धाडस कोणी या देशात करणार नाही. जर कोणी ते केलं तर आम्ही ते सहन करणार नाही. ओरिजनल शिवसेनेत खासदारांनी प्रवेश केला म्हणून आमच्याकडे आनंदाचं वातावरण असताना त्यांनी दु:खाचं मडकं या वक्तव्यावरून फोडलं. स्वत:ची पापं झाकण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आधार त्यांनी घेतला. माझी क्लिप अर्धवट दाखवली गेली. षण्मुखानंदमध्ये वर्धापनदिनी उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या या वक्तव्याचा उल्लेख केला होता. त्यावर मी बोललो आहे." अशी प्रतिक्रिया पावसकर यांनी दिली.



खरी शिवसेना असल्याचा शिंदेंचा दावा : पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेतृत्वाखालील शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलेली ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केला. नव्यानं पक्षात दाखल झालेल्या खासदारांचं स्वागत करताना त्यांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच त्यांच्या आगामी उमेदवारीबाबत सकारात्मक संकेत देत राजकीय संदेश दिला.

दरम्यान, पक्षप्रवेश केलेल्या खासदारांनी आपल्या निर्णयामागे मतदारसंघांच्या विकासाचा मुद्दा मांडला. निधीअभावी अनेक विकासकामं रखडत असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “एक नव्हे, तर सहा वाघ आज आमच्यासोबत आले आहेत.” या शब्दांत त्यांनी या पक्षप्रवेशाचे राजकीय महत्त्व अधोरेखित केलं.