ETV Bharat / state

मराठवाडा हादरला! नांदेडसह अनेक भागांत जाणवले धक्के; हिंगोलीत भूकंपाचे केंद्र

हिंगोली जिल्ह्यात आज मध्यरात्रीनंतर पहाटे 1 वाजून 37 मिनिटाला अचानक भूकंपाचे धक्के बसले. कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

earthquake in marathwada
डावीकडे भूकंपाचा केंद्रबिंदू, उजवीकडे प्रतिकात्मक फोटो (Source- IANS/ X account NCS_Earthquake)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 9, 2026 at 7:08 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नांदेड-मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालं. पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी रिश्टर स्केलवर अंदाजे 4.1 तीव्रतेचा भूकंप झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपाचे केंद्र हिंगोली शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावरील हिंगोली–बसमत परिसरात असल्याचे सांगितलं जात आहे. या धक्क्यांची तीव्रता हिंगोलीसह नांदेड, परभणी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्येही जाणवली.

मोबाईलवरील Android Earthquake Alerts System द्वारे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अंदाजे 4.4 इतकी नोंदविण्यात आली आहे. तर राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अंदाजे 4.1 इतकी आहे. भूकंपाचे केंद्र हिंगोली शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावरील हिंगोली–बसमत परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. धक्के बसताच अनेक नागरिक झोपेतून घाबरून बाहेर पडले. काही ठिकाणी घरांमधील पंखे, दरवाजे, खिडक्या आणि इतर वस्तूंना हलके कंपन जाणवल्याचं नागरिकांनी सांगितलं.


हिंगोलीसह नांदेड, परभणी आणि आसपासच्या भागातील अनेक नागरिकांनीही सोशल मीडियावर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही ठिकाणी काही सेकंदांसाठी कंपन जाणवल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, काही वेळात परिस्थिती पूर्ववत झाली.

सुदैवानं या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.


भूकंपानंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भूकंपाची अंतिम तीव्रता, केंद्रबिंदू आणि इतर तांत्रिक तपशील भारतीय हवामान विभाग (IMD) आणि संबंधित अधिकृत संस्थांकडून जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.