ETV Bharat / state

विदेशी भाविकांकडून साईबाबांच्या चरणी भरभरून दान; आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साई दर्शन

शिर्डी साईबाबांच्या झोळीत भाविक आपल्या इच्छेनुसार देणगी टाकतात. आज दुबईतील एका भाविकांनं आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण फ्रेम साईंना दान केली आहे.

Devotee Donated Gold
आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण फ्रेम (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 23, 2025 at 3:58 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी देश-विदेशातून कोट्यवधी भाविक शिर्डीत येत असतात. अढळ श्रद्धेनं प्रेरित होऊन भाविक साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण करतात. अलीकडच्या काळात परदेशस्थ साईभक्तांकडूनही मोठ्या प्रमाणावर संस्थानाला रोख रकमेबरोबर सोन्याचं दानही प्राप्त होत आहे.



सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण फ्रेम : अलीकडंच दुबई येथे वास्तव्यास असलेल्या एका साईभक्त कुटुंबानं साई मंदिरात "ओम साई राम" हे सुवर्ण अक्षर नाव देणगी स्वरूपात अर्पण केलं होतं. त्यानंतर याच भाविकानं साईबाबांच्या मुखदर्शनासाठी असलेल्या खिडकीसाठी आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण फ्रेम अर्पण केलीय. या सुवर्ण खिडकीतून आता भाविकांना समाधी मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीचं मुखदर्शन घेता येणार आहे. या कलात्मक नक्षीकामानं भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. साईबाबा संस्थानच्यावतीनं संबंधित भाविकाचा सत्कार करण्यात आला असून त्यांच्या विनंतीनुसार नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे.

साईबाबांना सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण फ्रेम अर्पण (ETV Bharat Reporter)

देशातील दान किती : गेल्या काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशातील हरदासपूर येथील साईभक्त तेज बहादुर सिंह यांनी साईबाबांच्या चरणी 200 ग्रॅम वजनाचा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या कलात्मक मुकुटाची अंदाजे किंमत 20 लाख 16 हजार रुपये असून हा मुकुट साईबाबा संस्थानच्या ताब्यात देण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साईभक्तानं साईबाबांच्या चरणी 102.450 ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली. या मूर्तीची अंदाजे किंमत 12 लाख 39 हजार रुपये असून या भाविकानेही आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

कोणत्या वस्तू साईबाबांना अर्पण : देश-विदेशातील लाखो भाविकांची साईबाबांवर अढळ श्रद्धा असून, त्यातूनच सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती तसंच रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणावर दान केलं जात आहे. भाविकांच्या या दानातून साईबाबांच्या मंदिरात सोनेरी सिंहासन, सोनेरी गाभारा, श्रद्धा-सबुरीची सुवर्ण अक्षरे, हिरेजडित मुकुट, पादुका, सुवर्ण फ्रेम, आरतीसाठीचे पूजासाहित्य, घंटा, उदबत्ती स्टँड, मंदिराचा कळस तसेच सोन्याचा रथ आणि पालखी यासारख्या अनेक वस्तू अर्पण करण्यात आल्या आहेत.



साईबाबा हॉस्पिटलसाठी 1 कोटी 4 लाख रुपये : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या साईबाबांच्या शिकवणीनुसार साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयासाठीही भाविकांकडून महत्त्वपूर्ण योगदान दिलं जात आहे. मुंबई येथील साईभक्त डॉ. श्रीराम अय्यर यांनी त्यांच्या प्रिज्मा ग्लोबल लिमिटेड या कंपनीमार्फत गेल्या 5 दिवसापूर्वी साईबाबा हॉस्पिटलसाठी 1 कोटी 4 लाख रुपये किंमतीची अत्याधुनिक 2D ECHO EPIQ CVX अल्ट्रासाऊंड मशिन देणगी स्वरूपात प्रदान केली आहे. या मशिनमुळं हृदयविकाराशी संबंधित तपासण्या अधिक अचूक, जलद आणि परिणामकारक पद्धतीनं करता येणार असून रुग्णसेवेला मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा -

  1. शिर्डी नगरपरिषद निवडणूक निकाल : महायुतीनं महाविकास आघाडीचा केला सुपडासाफ, विखे पाटलांनी नगरपरिषदेचा राखला गड
  2. शिर्डीला जागतिक धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सक्षम विश्वस्त मंडळाची गरज; भाविकांसह ग्रामस्थांची मागणी
  3. अहमदाबादच्या साईभक्तांकडून 12.39 लाखांची 'सोन्याची श्रीगणेश मूर्ती' शिर्डी साईबाबांना अर्पण