नवीन वर्षाचा जल्लोष; ठाण्यात तळीरामांची संख्या घटली, तरी इतक्या 'झिंगाट' चालकांवर कारवाई
ठाण्यात नवीन वर्षाचं स्वागत करताना तरुणांनी मोठा जल्लोष केला. मात्र पोलीस विभागाच्या जनजागृतीमुळे यावर्षी तळीरामांची संख्या घटली, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.


Published : January 1, 2026 at 4:09 PM IST
ठाणे : थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी तळीरामांनी वाहन चालवू नये, असं आवाहन करून जनजागृती केली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तळीरामांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 31 डिसेंबर या नववर्षाच्या पूर्वसंध्येला 224 तळीराम चालकांसह 12 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 224 जणांवर मोटार वाहन कायदा 185 नुसार तर, वाहन चालकांसोबतच्या 12 जणांवर मोटार वाहन कायदा 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे. गतवर्षी एकूण 311 तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.
ठाण्यात तळीराम चालकांची संख्या घटली : ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरं येतात. या परिसरातील 35 पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 18 वाहतूक कक्ष कार्यरत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 जवानांच्या साथीनं एकूण 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल 224 तळीरामांवर कारवाई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या तपासणीत तब्बल 224 तळीराम चालक तावडीत सापडले. तर 12 सहप्रवाश्यांवर कारवाई करण्यात आली. यात वाहन चालकांवर वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री केलेल्या कारवाईमध्ये ठाणे विभागात - 59, वागळे विभागात - 33, भिवंडी विभागात - 49, कल्याण विभागात - 65 आणि उल्हासनगर विभागात- 30 अशी एकूण 236 तळीरामांवर कारवाई केली, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.
हेही वाचा :

