ETV Bharat / state

मुंबई विमानतळावर 4.20 कोटी रुपयांचं 24 कॅरेट शुद्ध सोन्याचं मेण हस्तगत करण्यात DRI ला यश

दुबईहून प्रवासी बनून आलेल्या दोन कॅरियर्ससह ते सोन स्वीकारण्यासाठी आलेल्या नवी मुंबईतील एका सराफालाही DRI कडून अटक करण्यात आलीय.

DRI succeeds in seizing 24 carat pure gold
सोन्याचं मेण हस्तगत करण्यात DRI ला यश (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 2, 2026 at 12:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRI मुंबईनं सोने तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी दोन कॅरियर्सना अटक करीत त्यांच्याकडून 4.2 कोटी रुपयांचे 2.6 किलो वजनाची सोन्याचं मेण जप्त केलंय. तसेच ते नेण्यासाठी आलेल्या नवी मुंबईतील एका सराफालाही अटक करण्यात आलीय.

कसं झालं ऑपरेशन 'गोल्ड वॅक्स'? - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई शाखेनं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केलाय. यावेळी त्यांनी मेणाच्या स्वरूपातील परदेशी बनावटीचं 2.6 किलो सोनं जप्त केलंय, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दुबईहून सोन्याचा ताबा घेऊन मुंबईकडे निघालेल्या दोन व्यक्तींवर DRI ची पाळत होती. मेणासारखं वितळवून आणलेलं हे सोनं त्यांनी आपल्या सामानात लपवून ठेवलं होतं. हे दोघे मुंबई विमानतळावर उतरताच त्या दोघांशी संपर्क साधणाऱ्या नवी मुंबईतील एक सराफालाही हे सोनं स्वीकारताना DRI नं रंगेहात अटक केलीय.

कशी सुरू होती सोन्याची तस्करी? - दुबईहून या टोळीद्वारे चालवल्या जाणाऱ्या कारवायांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे DRI नं दोन प्रवाशांना विमानतळावरून सोने बाहेर नेण्याचा प्रयत्न करत असतानाच अडवलं. त्यांच्या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की, नवी मुंबईतील एका सराफानं आपल्या इतर साथीदारांशी संगनमत करून दुबईहून भारतात सोन्याची तस्करी करण्याचा हा सक्रिय कट रचला होता, त्यासाठी दोन प्रवाशांची कॅरिअर म्हणून निवड करण्यात आली. विमानतळावर त्यांची अंगझडती घेतली असता मेणाच्या स्वरूपातील सोन्याची भुकटी (gold dust) असलेली दोन पाऊच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेत. या सोन्याचं एकूण वजन 2600 ग्रॅम इतके असून, ते 24 कॅरेट शुद्ध प्रतिचं असल्यानं त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 4.20 कोटी आहे. 'सीमा शुल्क कायद्या'नुसार (Customs Act) हे सोनं जप्त करण्यात आलंय. सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करत या प्रकरणी डीआरआय पुढील तपास करीत आहे.

DRI च्या सतर्कतेमुळे हाणून पडला डाव - सध्याच्या परिस्थितीत देशातील परकीय चलन वाचवण्यासाठी आणि इथल्या आर्थिक सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं सोन्यावर लादलेले वाढीव शुल्क आणि इतर करांच्या पार्श्वभूमीवर ही यशस्वी कारवाई विशेष महत्त्वाची ठरते. ही कारवाई DRI ची भक्कम गुप्तचर क्षमता, जलद कृती प्रतिसाद आणि व्यवस्थेतील बेईमान घटक व संघटित तस्करी टोळ्यांकडून होणारे सोन्याच्या तस्करीचे नवे प्रयत्न शोधून काढत ते हाणून पाडण्यासाठी केलेल्या समन्वित अंमलबजावणी प्रयत्नांना अधोरेखित करतं.

हेही वाचाः