जुन्या निवासी इमारतींची किचकट पुनर्विकास प्रक्रिया आता होणार सोपी; एआयच्या मदतीनं व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे सेवा
पुण्यात ड्रीम्स रीडेव्हलप्डने ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ (Redevelopment Guru) ही एआय-आधारित व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली असून, सोसायटी सदस्यांना पुनर्विकासासंदर्भातील माहिती आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

Published : September 2, 2026 at 8:19 PM IST
पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरासह परिसरात जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाला मोठ्या प्रमाणावर वेग आलाय. मात्र, अनेक सोसायटीच्या लोकांना पुनर्विकास करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. असं असताना, गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत सदस्य आणि विकासक यांच्यातील माहितीची दरी भरून काढण्यासाठी पुणेस्थित ड्रीम्स रीडेव्हलप्ड, या पुनर्विकास सल्लागार संस्थेनं 'रीडेव्हलपमेंट गुरु' (Redevelopment Guru) ही व्हॉट्सअॅपवर आधारित सेवा सुरु केलीय. पुनर्विकासासंदर्भातील प्रश्नांची जलद आणि सरकारी स्रोतांवर आधारित उत्तरे सोसायटीच्या सदस्यांना मिळावीत, तसेच उपलब्ध माहितीच्याआधारे योग्य निर्णय घेता यावेत, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं ड्रीम्स रीडेव्हलप्डचे संस्थापक एस. लक्ष्मीनारायणन यांनी सांगितलं.
लक्ष्मीनारायणन यांनी उपक्रमाची माहिती दिली : पुण्यात आज ड्रीम्स रीडेव्हलप्डचे संस्थापक एस. लक्ष्मीनारायणन यांनी या उपक्रमाची माहिती दिली. व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले लक्ष्मीनारायणन यांनी हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आहे. भारतातील शेअर बाजार आणि वीज विनिमय क्षेत्रात त्यांनी आठ वर्षांहून अधिक काळ काम केलंय.
ड्रीम्स रीडेव्हलप्ड काय? : ड्रीम्स रीडेव्हलप्ड ही 2020 मध्ये स्थापन झालेली पुनर्विकास सल्लागार संस्था आहे. भारतीय गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत सोसायटी आणि विकासक यांच्यातील माहितीची दरी कमी करण्यासाठी संस्था कार्यरत आहे. महारेरा आणि आयजीआर नोंदींच्या आधारे व्यवहार्यता तपासणी, विकासकाची पडताळणी, कराराची तपासणी तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या तयारीसह विविध सल्लागार सेवा संस्था पुरवते. ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ या व्हॉट्सअॅप सहाय्यकाच्या माध्यमातून ही माहिती आता थेट सोसायटीच्या वैयक्तिक सदस्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
एआयच्या मदतीनं व्हॉट्सअॅपवर ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ सुरू : यावेळी बोलताना एस. लक्ष्मीनारायणन म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घराचा आणि सोसायटीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना अनेक अडचणी येतात. या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही एआयच्या मदतीनं व्हॉट्सअॅपवर ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ सेवा सुरू केली आहे. नागरिक या माध्यमातून त्यांचे प्रश्न मांडू शकतील. त्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडून देण्यात येणार आहेत. कशा पद्धतीनं प्रश्न सोडवले पाहिजेत? किती वर्षे बिल्डिंग जुनी असेल तर काय फायदा मिळू शकतो?, तेदेखील या रीडेव्हलपमेंट गुरुच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे.
पुनर्विकासासंदर्भातील प्रश्न व्हॉट्सअॅपवर विचारू शकतात : ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक तसेच आयुष्यभराच्या बचतीतील मोठा हिस्सा घरामध्ये गुंतवलेल्या सभासदांचा विशेष विचार करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सदस्य पुनर्विकासासंदर्भातील प्रश्न थेट व्हॉट्सअॅपवर विचारू शकतात. त्यांना महारेरा नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागातील मालकी हक्काचा इतिहास तसेच संबंधित नियमावली यांसारख्या पडताळता येणाऱ्या स्रोतांशी जोडलेली उत्तरे मिळणार आहेत. विकासक, सोसायटी समिती, वास्तुविशारद, कायदेविषयक तज्ज्ञ तसेच पुनर्विकास क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करताना कोणते प्रश्न विचारावेत, याबाबतही सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
कशी सुचली कल्पना? : पुण्यातील स्वतःच्या गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत अध्यक्ष म्हणून काम करताना संस्थेचे संस्थापक सीए एस. लक्ष्मीनारायणन यांना या उपक्रमाची कल्पना सुचली. एकदा सोसायटीतील एका सदस्यानं त्यांना असा प्रश्न विचारला, ज्याचं तत्काळ उत्तर त्यांच्याकडं उपलब्ध नव्हतं. या अनुभवातून सदस्यांना पुनर्विकासाशी संबंधित विश्वसनीय माहिती सहज उपलब्ध करून देण्याची गरज त्यांना निर्माण झाली. यातून त्यांनी हे सेवा सुरू केली.
400 हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांसोबत काम : ड्रीम्स रीडेव्हलप्डने आतापर्यंत 400 हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांसोबत काम केलं आहे. संस्थेने 125 हून अधिक व्यवहार्यता अहवाल तयार केले असून, त्यापैकी 24 प्रकल्पांचे औपचारिक व्यवहार पूर्ण होऊन बांधकामास सुरुवात झाली आहे. संस्थेच्या नेटवर्कमध्ये सध्या 112 विकासकांसह वास्तुविशारद, कायदेविषयक तज्ज्ञ आणि पुनर्विकास क्षेत्रातील तज्ज्ञांसह 40 हून अधिक संलग्न सल्लागार यांचा समावेश आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात संस्थेचे कामकाज सुरू आहे.
नागरिकांकडून कोणते प्रश्न विचारले जातात? : ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ या व्हॉट्सअॅप सेवेद्वारे नागरिकांकडून विविध प्रश्न विचारले जातात. “मी जिवंत असेपर्यंत घर मिळेल का?”, “माझी फसवणूक तर होणार नाही ना?”, “पुनर्विकासानंतर सोसायटीचे मेंटेनन्स किती वाढेल?” यांसारखे प्रश्न सर्वाधिक विचारले जात असल्याचं लक्ष्मीनारायणन यांनी सांगितलं.
हेही वाचा -

