ETV Bharat / state

अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीत नवा ट्विस्ट, DGCA नं VSR व्हेंचर्सच्या चार लिअरजेट विमानांवर बंदी घातली

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचं ​​विशेष सुरक्षा ऑडिट केलं. यामध्ये असंख्य गंभीर त्रुटी आढळल्या. यानंतर 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

DGCA Grounds four Aircraft of VSR Ventures
DGCA नं VSR व्हेंचर्सच्या चार लिअरजेट विमानांवर बंदी घातली (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 12:50 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

बारामती (पुणे) : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी बारामती इथं झालेल्या विमान अपघातात निधन झालं. अजित पवार प्रवास करत असलेल्या Learjet 45 (VT-SSK) या विमानाला बारामतीत अपघात झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर संबंधित कंपनी M/s VSR Ventures Pvt. Ltd. वर विविध स्तरांवरून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) नं कंपनीविरोधात मोठी प्रशासकीय कारवाई करत विशेष सुरक्षा लेखापरीक्षणानंतर कंपनीची 4 विमानं तत्काळ ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला आहे. DGCA कडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कंपनीच्या सुरक्षा प्रक्रियेवर आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपास आणि कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विमान कंपनीत अनेक त्रुटी आणि नियमांचं उल्लंघन : दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) नं कंपनीचा सखोल 'स्पेशल सेफ्टी ऑडिट' केला. या बहुविभागीय तपासणीदरम्यान एअरवर्दिनेस, एअर सेफ्टी आणि फ्लाइट ऑपरेशन्स या क्षेत्रांमध्ये मंजूर प्रक्रियांतील अनेक त्रुटी तसेच नियमांचं उल्लंघन आढळून आलं. देखभाल प्रक्रियेमध्येही गंभीर उणिवा असल्याचं निदर्शनास आलं.

या पार्श्वभूमीवर कंपनीच्या Learjet 40/45 प्रकारातील VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या नोंदणी क्रमांकांच्या विमानांना पुढील आदेशापर्यंत उड्डाणास मज्जाव करण्यात आला आहे. एअरवर्दिनेसची आवश्यक मानकं पूर्ण होईपर्यंत ही विमानं ग्राउंडच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, विमान दुर्घटनेनंतर कंपनीकडे आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता नव्हती, असा आरोप विविध स्तरांतून करण्यात आला होता. या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनीही कंपनीच्या व्यवस्थापनावर आणि मालकांवर कठोर शब्दांत टीका केली होती. दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती.

DGCA नं कंपनीला आढळलेल्या त्रुटींवर 'रूट कॉज अ‍ॅनालिसिस' सादर करण्यासाठी डिफिशियन्सी रिपोर्टिंग फॉर्म जारी केले आहेत. कंपनीकडून सादर होणाऱ्या स्पष्टीकरणाचे परीक्षण करून पुढील मूल्यांकनानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पुढील चौकशीकडे सर्वांचं लक्ष : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता. या दुर्घटनेनंतर विमान सुरक्षा, खासगी चार्टर सेवा आणि नियामक यंत्रणेच्या कार्यप्रणालीबाबत व्यापक चर्चा सुरू झाली होती. आता DGCAच्या कारवाईमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून पुढील चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा