ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाकारले, तर निधी नाही; अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी कशी केली सारवासारव?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले कथित मतभेद, दिल्ली बॉम्ब स्फोटासह विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते नागपुरात कार्यक्रमांसाठी आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

Devendra Fadnavis over Ajit Pawar Remark
संग्रहित- देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat Reporter)
author img

By PTI

Published : November 23, 2025 at 5:24 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर- उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मते दिलीच तर विकासनिधी देऊ, अशा आशयाचं वक्तव्य केल्यानंतर महायुती सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करत, कोणताही भेदभाव केला जात नसल्याचं म्हटलं. तसेच राज्यातील सर्व विभागांचा विकास करण्याचे ध्येय असल्याची मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याचे माध्यमातील दावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले आहेत. या चर्चा तथ्यहीन आहेत. आम्ही दोघे नियमित भेटून चर्चा करतो. माध्यमांमधील मतभेदाचे करण्यात आलेले दावे हे चुकीचे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

ते तोंडघशी पडतील-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अविश्वास असल्याच्या चर्चांनादेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. ते दावे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हा मुर्खांचा बाजार आहे. काही माध्यमदेखील या बाजारात सहभागी झाले आहेत. मी आणि शिंदे साहेब परवा हुतात्मा स्मारकाच्या कार्यक्रमात भेटलो होते. तेव्हा आम्ही बोललोदेखील होतो. आम्ही न बोलण्याचं काहीही कारण नव्हतं. माध्यमे दाखवित असल्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. जे लोक दाखवित आहेत, ते तोंडघशी पडतील, असे भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

त्यांचा तसा उद्देश नसतो- महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या अजित पवारांच्या वक्तव्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या सर्व भागांचा विकास करण्याकरिता सरकार वचनबद्ध आहे. निवडणुकीच्या काळातील भाषणामध्ये अनेकदा बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. पण, ते सर्व तसे नसते. आमच्या सहकारी पक्षांनी किंवा कोणीही तसे म्हटले तरी त्यांचा तसा उद्देश नसतो. त्यांच्याकडून कधीही भेदभावाची वागणूक दिली जाणार नाही. आम्ही जरी काही जागांवर स्वतंत्रपणे लढत असलो तरी, येत्या निवडणुकीत निश्चितच जनता महायुतीला निवडून देईल.

उपमुख्यमंत्री पवार यांनी काय केलं होतं वक्तव्य- अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील मालेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू नये, याकरिता काळजी घेईन, असे त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं जनतेला आवाहन केलं. जर त्यांना निवडणुकीत नाकारलं, तर मीदेखील नाकारेल (निधी), असा संकेतवजा स्पष्टपणे इशारा दिला. अजित पवार म्हणाले, जर राष्ट्रवादीच्या १८ उमेदवारांना निवडून दिले तर निधीची कोणतीही कमतरता राहणार नाही, याची मी खात्री देतो. जर तुम्ही राष्ट्रवादीच्या १८ उमेदवारांना निवडून दिले तर तुम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणं देण्यासाठी मी बांधील असेन. जर तुम्ही नाकारलं, तर मीदेखील नाकारेन. तुमच्याकडं मत आहे. माझ्याकडं निधी आहे.

एपीजे अब्दुल कलाम हे खरे आदर्श - जमियात-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदानी यांनी भारतात मुस्लिमांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप यांनी केला. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर कारवाईचं सत्र सुरू असताना त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, भारताचे दिवंगत, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिमांचे खरे आदर्श आहेत. आम्ही त्यांना नम्रपणानं वंदन करतो. त्यांनी नेहमीच देशाची मान उंचावली. त्यामुळे ते आदर्श आहेत. आम्ही दुसऱ्यांना आदर्श का मानावं?

ज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठी करावा- दिल्ली स्फोट आणि व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलवर कारवाई सुरू असताना काँग्रेस नेते रशीद अलवी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उच्चशिक्षीत तरुणांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठी करावा, हे खरं आहे. मात्र, काही शक्ती त्यांना कट्टर बनवित आहेत. त्यावर ते (काँग्रेस नेते) काही बोलणार आहेत का? जे तरुणांच्या मनात भारतविरोधी बीजे रोवत आहेत, त्या शक्तींना ते विरोध करणार आहेत का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेत्यांना उद्देशून केला. जे भारतविरोधी कृत्यांमध्ये सहभागी आहेत, त्यांची जात, धर्म आणि वंश न पाहता कारवाई करायला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

काय आहे व्हाईट कॉलर मॉड्यूल?श्रीनगर पोलिसांनी सखोल तपास करून १० नोव्हेंबरला दहशतवाद्यांचे व्हाईट कॉलर मॉड्यूल उद्धवस्त केले. प्रकरणात पोलिसांनी तीन डॉक्टरांसह ८ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. उच्चशिक्षीत असलेले आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या दहशतवाद्यांचे नेटवर्कमुळे दहशतवाद्यांचे नवे मॉड्यूल उजेडात आले. मात्र, डॉ. उमर-उन-नबी यानं पोलिसांना चकवा देऊन दिल्लीत १० नोव्हेंबरला लाल किल्ला परिसरात कारद्वारे स्फोट घडवून आणला. या दहशतवादी हल्ल्यात १५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.

हेही वाचा-