'त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर तयार झाल्यानंतर विकासकामे पाहून लोकांना आश्चर्य वाटेल'-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कुंभमेळ्यासाठी काय विकासकामे सुरू आहेत? काय आव्हाने आहेत? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना माहिती देत कुंभमेळा यशस्वी करू, असा विश्वास व्यक्त केला.

Published : August 28, 2026 at 10:18 PM IST
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 35 हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कामे सुरू असल्यानं नाशिककर त्रस्त आहेत. नागरिक शिव्या घालत आहेत. मात्र, काळजी करू नका. कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिक आपला सत्कारही करतील. चांगले काम करताना शिव्या खाण्याचीही तयारी ठेवली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. सिंहस्थ महा कुंभमेळा भक्ती संगम कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री नाशिकला आले असताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत. कितीही विघ्न आले तरी कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पाडू. साधू-संतांच्या आशीर्वादाने कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडू. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भुसे, जयेश कुमार रावल, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभमेळा ही प्राचीन परंपरा असून जगात याला कुठेही तोड नाही. कुंभ किती जुना आहे, हे कुणालाही माहिती नाही. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येही कुंभमेळ्याचा उल्लेख पाहायला मिळतो. समुद्रमंथनावेळी ज्या ठिकाणी अमृत पडले, त्याठिकाणी कुंभमेळा भरतो, अशी श्रद्धा आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अमृत पडल्यामुळे दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात साधू-महंत नाशिकमध्ये येतात. देशभरातून विविध प्रकारचे भाविक कुंभमेळ्यात सहभागी होतात. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा भव्य धार्मिक सोहळा कुठेही पाहायला मिळत नाही. कुंभाच्या पार्श्वभूमीवर होणारे मंथन आणि चिंतन हेच खरे अमृत आहे.
मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांच्या काही मागण्या असून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. साधुग्रामची जागा कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. साधुग्रामची जागा अधिग्रहित करण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च केले आहेत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कुंभमेळा यशस्वी करू- मुख्यमंत्र्यांनी विकासकामांबाबत माहिती देताना म्हटलं की, गोदावरी नदी निर्मळ करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सांडपाणी आणि मैलापाणी गोदावरी नदीत जात होते. ते थांबवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. यापुढे गोदावरी नदीत केवळ स्वच्छ पाणी जाईल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. नाशिकमध्ये सध्या 40 ते 50 लाख लोकांचा भार सहन करण्याचीच क्षमता आहे. मात्र, कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक येणार असल्यानं त्यानुसार पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. 34 हजार कोटी रुपये कशासाठी खर्च करता?असा प्रश्न काही बालबुद्धी लोकं उपस्थित करत आहेत. मात्र, या निधीतील मोठा हिस्सा कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खर्च होत आहेत. त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर तयार झाल्यानंतर विकासकामे पाहून लोकांना आश्चर्य वाटेल. आपण ज्या त्र्यंबकेश्वरला येत होतो, हेच ते त्र्यंबकेश्वर आहे का? असे वाटेल, अशा पद्धतीने विकास केला जाणार आहे.
हेही वाचा-

