देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचे प्रश्न कुठे कळतात? मूळ मुंबईकरांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा सवाल
मुंबईचा विकास, वाढता भ्रष्टाचार, 50 खोक्यांचा आरोप, ठाकरे बंधूंना 20 वर्षांनंतर एकत्र येण्याची गरज का वाटली अशा अनेक मुद्द्यांवर उद्धव आणि राज ठाकरेंनी भाष्य केलंय.

Published : January 8, 2026 at 12:06 PM IST
|Updated : January 8, 2026 at 12:40 PM IST
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बहुतांश सत्ताधारी हे मूळचे मुंबईचे नाहीत. त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणी आणि भावना त्यांना पूर्णपणे समजत नाहीत, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी मतदानाला काहीच दिवस उरले असताना राज ठाकरे यांनी ‘मूळ मुंबईकर’ असण्याचा मुद्दा उपस्थित केलाय. दैनिक सामनासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकत्रित मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलीय. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झालाय. यात मुंबईचा विकास, वाढता भ्रष्टाचार, 50 खोक्यांचा आरोप आणि ठाकरे बंधूंना 20 वर्षांनंतर एकत्र येण्याची गरज का वाटली अशा अनेक मुद्द्यांवर उद्धव आणि राज ठाकरे यांनी भाष्य केलंय.
मुंबईचे प्रश्न समजण्यासाठी मूळ मुंबईकर असणं गरजेचं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बहुतांश सत्ताधारी हे मूळचे मुंबईचे नाहीत. त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणी आणि भावना त्यांना पूर्णपणे समजत नाहीत हे सांगताना राज ठाकरे यांनी त्यांचा स्विझर्लंडचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी एकदा स्विझर्लंडला गेलो होतो. तिकडची हवा शुद्ध आहे. सुंदर निसर्ग आहे. चांगले रस्ते, उत्तम सुविधा सगळं आहे. तेव्हा मला प्रश्न पडला की, इथला विरोधी पक्ष कोणते मुद्दे मांडत असेल? त्यांचेही प्रश्न असतील. पण आपल्याला ते कळत नाहीत. तसंच मुंबईचं आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. इतर बरेच राज्यकर्ते हे मुंबई बाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईचे प्रश्न कळत नाहीत. ते मुंबईची तुलना त्यांच्या जिल्ह्यातील लोडशेडिंग किंवा रस्त्यांच्या प्रश्नांशी करतात.” मुंबईचे प्रश्न समजण्यासाठी मूळ मुंबईकर असणं गरजेचं आहे, असं ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या विकासाची खरी सुरुवात गडकरींच्या कार्यकाळातच : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांत मुंबईतील मराठी माणसासाठी नेमकं काय केलं, याचं उत्तर दिलं पाहिजे. मुंबईच्या विकासाची खरी सुरुवात नागपूरचे नितीन गडकरी यांच्या कार्यकाळातच झाली, असा दावाही त्यांनी केलाय. तसेच आम्ही मुंबईत जन्मलो नाही, ही बाब आमचा गुन्हा किंवा दोष नाही, असं स्पष्ट करत फडणवीस यांनी टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
आज एकत्र नाही आलो तर महाराष्ट्र आम्हाला माफ करणार नाही..! : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षं का वाट पाहावी लागली? या प्रश्नावर राज ठाकरेंनी, आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ करणार नाही, असं म्हटलं. राज ठाकरे म्हणाले, “काही गोष्टी कशा घडल्या? का घडल्या हे आपण सोडून दिलं पाहिजे. काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं? हे आज आता सोडून दिलं पाहिजे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलं.
महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय : काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे." महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयावर अनेक वर्षे मी बोलतोय, उद्धवही बोलतोय. परंतु आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे, ज्याला आपण ‘अभी नही तो कभी नही’ तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार!," असंही राज ठाकरे म्हणालेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे : उद्धव ठाकरे याबाबत बोलताना म्हणाले, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील.
50 खोक्यांसाठी 2 हजार कोटी बँकेतून कर्ज काढून नाही आणले..! : मुंबई महापालिकेत तीन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला जातोय. मात्र, जर इतका प्रचंड पैसा होता, तर शिंदे गटात गेलेले आमदार केवळ 50 कोटी रुपयांसाठी पक्ष सोडून का गेले, असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना विचारला. संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी, या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलण्याच गरज व्यक्त केली. “50 खोके, 50 खोके” असा उल्लेख सतत केला जातो, मात्र लोकांना याचा नेमका अर्थ समजायला हवा. 50 खोके म्हणजे थेट 50 कोटी रुपये. जर 40 आमदार असतील, तर ही रक्कम तब्बल 2 हजार कोटी रुपयांपर्यंत जाते. एवढा पैसा नेमका कुठून आला? कसा उभा केला गेला? बँकेतून कर्ज घेतलं नव्हतं ना? मग अशा परिस्थितीत कोणत्या भ्रष्टाचारावर कोण बोलणार, असा थेट सवाल उपस्थित केलाय.
आमचा एकही उमेदवार बिनविरोध का निवडून आला नाही? : भाजपाचे 60 हून अधिक उमेदवार आणि एकनाथ शिंदेंचे काही उमेदवार इतके उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. जर पैशांचा, दबावाचा वापर नाही झाला तर मग शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार यांचा एकही उमेदवार का बिनविरोध निवडून आला नाही? ही विचार करण्यासारखी बाब आहे, असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय. याचबरोबर या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी मुंबईकर म्हणून काही प्रश्न उपस्थित केले. मुंबईचं वाढतं प्रदूषण, रस्ते, ट्रॅफिकची समस्या हे प्रश्न कधी संपणार आहेत? यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विविध प्रकल्पांसाठी प्रचंड झाडं कापली जाताहेत. आरेमध्ये कारशेड करण्याला त्यासाठी विरोध केल्याचं त्यांनी म्हटलं. पण सर्व रस्ते एकत्र खोदून ठेवणे, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, मँग्रोव्हज नष्ट करणे यामुळे मुंबईचा समतोल बिघडत चालला असल्याचे ते म्हणाले.
महापालिकेतही त्यांची सत्ता आल्यास हतबल होऊन पाहावे लागणार : मुंबईतील मतदारांबद्दल बोलताना मतदारांनी मतदानातून राग व्यक्त करण्याची गरज असल्याचं मत राज ठाकरेंनी मांडलंय. लोकांनी मतदानातून राग व्यक्त करणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर राजाने मारलं काय आणि पावसानं झोडलं काय? तक्रार कोणाकडे करायची? राज्यात भाजपाची सत्ता आहे. केंद्रात त्यांची सत्ता आहे, जर महापालिकेतही त्यांची सत्ता आली तर हतबल होऊन पाहत राहण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही, असं सावध आवाहन राज ठाकरे यांनी या मुलाखतीतून केलंय. या मुलाखतीचा दुसरा भाग लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यात ठाकरे बंधूंनी कोणते मुद्दे मांडले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
हेही वाचाः
ज्याचा केला पराभव, त्याचाच करा प्रचार; पक्षाच्या अजब निर्णयामुळं भाजपाच्या माजी नगरसेवकाची गोची
शरद पवार हे भाजपप्रणीत एनडीएसोबत जाणार नाहीत, संजय राऊतांची रोखठोक भूमिका

