ETV Bharat / state

'ते डोकी भडकवतील तुम्ही शांत रहा; लक्षात ठेवा, सर्वांच्या सोबतीनंच शहराचा विकास शक्य,' अजित पवारांचं आवाहन

अमरावतीच्या विकासासाठीही सर्वांनी आपुलकी जपावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी शुक्रवारी सभा घेतली.

Ajit Pawar's election rally
अजित पवारांची प्रचार सभा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 10, 2026 at 10:20 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : सर्व जाती, पंथ, धर्म आणि समाज एकत्रितपणे राहिले, तरच शहराचा विकास शक्य होतो. शहरात आपुलकी आणि सलोखा नांदत असेल, तर गुंतवणूकदारांना असं शहर आकर्षक वाटते आणि विकासात्मक गुंतवणूक होते. अमरावतीच्या विकासासाठीही सर्वांनी आपुलकी जपावी, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, "काहीजण भडकवण्याचा प्रयत्न करतील, मात्र नागरिकांनी शांतता आणि संयम राखावा. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकोपा हाच खरा मार्ग आहे."

महापालिका निवडणूक प्रचारासाठी जाहीर सभा : वास्तविक, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (9 जानेवारी) अमरावतीत जाहीर सभा घेतली. या वेळी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच निवडणूक लढवणारे सर्व ८७ उमेदवार उपस्थित होते.

अमरावतीकडं विशेष लक्ष द्या - आमदार खोडके : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा शहरात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप आमदार सुलभा खोडके यांनी केला. अमरावतीचं वातावरण शांत आणि सौहार्दपूर्ण असून सर्व नागरिक परस्परांशी चांगल्या भावनेने राहत आहेत, असं त्या म्हणाल्या. मात्र, विषारी टीका करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे शहराचं वातावरण बिघडवलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. निवडणूक काळात जाणीवपूर्वक वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगत, अशा परिस्थितीत प्रशासनानं सतर्क राहावं, यासाठी अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात, अशी विनंती आमदार सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

'चुकीच्या रस्त्याने जाऊ नका' : "आज पुणे, रायगड, नाशिक, नागपूर या शहरांचा वेगानं विकास होत आहे. अमरावती हे विभागीय शहर असून त्याचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक तो निधी देण्याची आमची तयारी आहे," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, "विकास साधायचा असेल, तर शहरात सामाजिक सलोखा राखणं आवश्यक आहे. कोणीही चुकीच्या मार्गानं जाऊ नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी. पुढील अनेक पिढ्यांना विकासाचा मार्ग दाखवायचा असेल, तर वाद न घालता शांतता व एकोपा जपणं अत्यंत गरजेचं आहे."

'अमरावतीत राष्ट्रवादीचाच महापौर होणार' : "खरं तर, शहरातील सर्व ८७ जागांवर उमेदवार देणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. अमरावतीच्या विकासाला नव्या जोमानं सुरुवात झाली असून ही गती आणखी वाढवण्यासाठी महापालिकेत निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल. अमरावतीचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल," असा विश्वासही आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला.

हेही वाचा