अमोल बालवडकरवर झालेल्या अन्यायाचा बदला घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुणेकरांना आवाहन
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. या सभेत त्यांनी महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात देण्याचं आवाहन जनतेला केलं.

Published : January 5, 2026 at 10:12 AM IST
पुणे : महापालिका निवडणुकांचा प्रचार रंगात आला आहे. प्रचार सभांमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाची शृंखला सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (4 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपावर तोंडसुख घेतलं.
यावेळी त्यांनी महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं आवाहनही उपस्थित जनतेला केलं. ते म्हणाले की, "केंद्र आणि राज्य सरकारनं पुण्याला भरपूर निधी दिला. पण पुण्यातील नेत्यांचा कारभार पुण्याच्या विकासासाठी पुरेसा नाही. मला पुण्याचा कारभार द्या, मी पुण्याचा विकास करेन."
खरं तर, महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, गायत्री कोकाटे, पार्वती निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.
'मला कारभार द्या, मी पुण्याचा विकास करेन' : या सभेत अजित पवारांनी भाजपावर हल्लाबोल करत सांगितलं की, "या वेळची निवडणूक वेगळी आहे. आम्ही केंद्रात एनडीए सरकारमध्ये आहोत, राज्यात महायुतीसह काम करत आहोत. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढत आहोत."
ते पुढे म्हणाले, "आधी देखील आघाडीत असताना आम्ही महापालिकेच्या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर स्वतंत्र लढत असायचो. महापालिकेला विविध माध्यमांतून निधी मिळत असला तरी, ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी काय केलं, हे आपल्याला माहित आहे."
पुण्यातील त्रिमूर्तीवर दोषारोप करत अजित पवार म्हणाले, "पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पण आज पुण्यातील समस्यांची काय स्थिती आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेचे लोक आहोत आणि सर्व धर्मीय आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत."
भाषणाच्या शेवटी त्यांनी पुणेकरांना आवाहन केलं की, "केंद्र आणि राज्य सरकारनं पुण्याला दिलेल्या निधीच्या तुलनेत, येथील कारभारी कमी पडले आहेत. मला पुण्याचा कारभारी बदलायचा आहे. पुणेकरांना माझं आवाहन आहे की, मला पुण्याचा कारभार द्या, मी पुण्याचा विकास करेन."
'निधीचा योग्य वापर झाला नाही' : 5 वर्षांच्या काळात पुण्याला दिला गेलेला निधी प्रभावीपणे वापरला गेला नाही, असा आरोपही अजित पवारांनी केला. ते म्हणाले, "5 वर्षांमध्ये जो काही निधी दिला गेला, तो मोठ्या प्रमाणावर होता. पण त्या निधीचा वापर योग्य प्रकारे करण्यात आलेला नाही. आज पुण्यातील वाहतूक कोंडी, विविध नागरी सुविधांचा अभाव, हे सर्व सांगतं की इथं सत्तेत असलेले लोक योग्य काम करत नाहीत."
'अमोल बालवडकरवरील अन्यायाचा बदला घ्या' : अजित पवारांनी भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या अमोल बालवडकर यांचं कौतुक केलं. त्यांनी सांगितलं, "अमोल बालवडकरनं पक्ष वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं, पण त्याला मिठाच्या खड्याप्रमाणे बाजूला काढलं गेलं".
" पुणे तुमचं-आमचं आहे. बाहेरचे लोक येतील आणि जातील, पण आपली माणसं ओळखा, आपले लोक पाहा. आज पुण्याचं नेतृत्व कमी पडत आहे, पण केंद्र आणि राज्य सरकारचं नेतृत्व चांगलं आहे."
ते पुढे म्हणाले, "जो अपमान अमोल बालवडकरचा करण्यात आला आहे, त्याचा बदला 15 तारखेला घ्यायचा आहे."
अमोल बालवडकर यांची चंद्रकांत पाटलांवर टीका : अमोल बालवडकर यांनी या सभेत भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला चढवला. "गेल्या दीड वर्षांपासून मला जे आश्वासन दिलं त्यासाठी मी काम करत होतो. पण ऐन निवडणुकीच्या वेळी एबी फॉर्म देतो, उद्या देतो असे सांगत, शेवटच्या दीड तासात माझा घात केला,"
"माझ्या आई-वडिलांच्या समोर शब्द देण्यात आला होता की, तुमच्या मुलाला मोठं करेन, पण विश्वासघात झाला. दीड वर्षांपूर्वी मला पेडा चारला, पण आज कळलं की त्यात विष होतं," अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील संताप व्यक्त केला.
हेही वाचा

